हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा ‘भोला’ हा सिनेमा आज प्रदर्शित झाला. या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद लाभत असल्याचे दिसत आहे. अशातच अजय देवगणचा बहुचर्चित आगामी सिनेमा ‘मैदान’च्या पोस्टरनंतर आज टिझरसुद्धा रिलीज झाला आहे. यामध्ये भारतीय फ़ुटबॉलचा असा एक काळ पहायला मिळतो आहे जिथून त्याचा पाया मजबूत रचला गेला. ‘एक माणूस, एक विश्वास, एक स्फूर्ती’ अशी टॅगलाईन असणारा अजय देवगणचा ‘मैदान’ आता बॉक्स ऑफिस गाजवण्यासाठी मैदानात उतरला आहे.
‘मैदान’च्या टीझर १९५२ सालची ऑलीम्पिक स्पर्धा सुरु असल्याचे दिसत आहे. दरम्यान कोसळणाऱ्या धो धो पावसात दोन संघामध्ये अटीतटीचा फुटबॉल सामना सुरु आहे. या सिनेमात १९५२ ते १९६२ सालातील भारतीय फुटबॉलचा सुवर्णकाळ आपल्याला पहायला मिळणार आहे. या काळात संघाला आलेल्या अडचणी, लोकांकडून झालेला विरोध आणि एका जिद्दीमुळे घडलेला इतिहास आपण पाहू शकणार आहोत. साधारण १ मिनिटाच्या या टिझरमध्ये आपल्याला कथानकातील वास्तविकता आकर्षित करत असल्याचे जाणवेल. टीझरच्या शेवटी दाखवलेल्या प्रसंगात ‘मैदानात उतरणार अकरा, पण दिसणार एक’ हा डायलॉग प्रेक्षकांची उत्सुकता वाढवण्याचे काम करतो आहे.
माहितीनुसार, हा चित्रपट भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक आणि व्यवस्थापक राहिलेल्या सय्यद अब्दुल रहीम यांच्यावर आधारित आहे. तसेच सिनेमात दाखवलेले प्रसंग हे वास्तविक आयुष्यात घडलेल्या प्रसंगांवरून प्रेरित आहेत. अभिनेता अजय देवगण हा सय्यद अब्दुल रहीम यांचीच भूमिका ‘मैदान’मध्ये साकारताना दिसणार आहे. सय्यद अब्दुल रहीम यांना भारतीय फुटबॉलच्या सुवर्णकाळाची सुरुवात करण्याचे श्रेय दिले जाते. कॅन्सरशी झुंज देत त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक मिळवले आणि म्हणून फुटबॉल विश्वात त्यांना खूप आदर आहे.
सय्यद अब्दुल रहीम हे १९५० ते १९६३ सालापर्यंत भारतीय राष्ट्रीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक आणि व्यवस्थापक होते. सय्यद अब्दुल रहीम हे मूळ हैद्राबादचे. हैदराबाद शहर पोलिसांचे प्रशिक्षक म्हणून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि पुढे १९५० मध्ये ते भारतीय राष्ट्रीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक झाले. तेव्हा भारतीय खेळाडू हे अनवाणी पायाने फुटबॉल खेळत असे. पण रहीम यांनी सूत्र हातात घेताच भारतीय संघाला शूज घालून फुटबॉल खेळायला शिकवले आणि जगातील बलाढ्य संघांमध्ये एक महत्वाचे स्थान मिळवून दिले. अशा या व्यक्तिमत्वावर आधारित ‘मैदान’ या चित्रपटाचे दिग्दर्शन अमित शर्मा करत आहेत. तसेच बोनी कपूर या चित्रपटाचे निर्माते आहेत.
Discussion about this post