हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या अनेक महिन्यापासून ‘रावरंभा’ या ऐतिहासिक प्रेमकथेवर आधारित मराठी चित्रपटाची जोरदार चर्चा रंगली होती. या चित्रपटातून ‘मुळशी पॅटर्न’ फेम अभिनेता ओम भूतकर आणि अभिनेत्री मोनालिसा बागल इतिहासातील मोरपंखी पान प्रेक्षकांसमोर अगदी अलगद उलघडणार आहेत. स्वराज्यासाठी तलवारीशी लगीन लागलेला ‘राव’ अन् त्या तलवारीची खडी ढाल ‘रंभा’ यांची गोष्ट ‘रावरंभा’ ही सह्याद्रीच्या कड्याकपाऱ्यांतील एक दुर्लक्षित मात्र अनोखी प्रेमकहाणी आहे. जिला वास्तवाचे भरजरी कोंदण आहे. या चित्रपटाच्या लक्षवेधी पोस्टरनंतर आता चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला आहे. ज्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
View this post on Instagram
चित्रपटाच्या टीझरमध्ये मावळ्यांची छत्रपती शिवाजी महाराजांप्रति असणारी भक्ती, निष्ठा आणि स्वतंत्र स्वराज्यासाठी असणारे प्रेम दिसून येत आहे. टीझरमध्ये ओम भुतकर आणि मोनालिसा बागल यांची केमिस्ट्री लक्ष वेधून घेत आहे. दमदार डायलॉग, ऐतिहासिक पेहराव, भव्य दिखावे आणि सुंदर लोकेशन्स आपले लक्ष खिळवून ठेवण्यात यशस्वी होत आहेत. हि कथा धैर्य, प्रामाणिकपणा आणि बलिदानाची आहे. घोडदौड, सळसळणाऱ्या लाटा, कडेकपार आणि शूर मावळ्यांच्या पराक्रमाने हि कथा नटलेली आहे. संसारापुढे स्वराज्य ठेवणाऱ्या राव आणि त्याच्या प्रत्येक निर्णयात त्याच्या साथीने उभी राहणारी रंभा यांच्या प्रेमाची आणि त्यागाची हि कथा नक्कीच प्रेक्षकांना आवडेल अशी अशी आहे.
View this post on Instagram
‘रावरंभा’ या ऐतिहासिक चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेता ओम भुतकर आणि अभिनेत्री मोनालिसा बागल हि जोडी आपल्या भेटीस येत आहेत. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत शंतनू मोघे आणि प्रतापराव गुजर यांच्या भूमिकेत अशोक समर्थ दिसणार आहेत. ‘रावरंभा’ हा चित्रपट येत्या १२ मे २०२३ रोजी सर्वत्र चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे निर्माते शशिकांत शीला भाऊसाहेब पवार हे आहेत. तर चित्रपटाचे दिग्दर्शन अनुप जगदाळे यांनी केले आहे. शशिकांत पवार प्रोडक्शन अंतर्गत येणाऱ्या ‘रावरंभा’ चित्रपटाची पटकथा आणि संवाद प्रताप गंगावणे यांचे आहेत. छायांकन संजय जाधव यांचे तर संकलन फैजल महाडिक यांचे आहे. सहनिर्माते अजित भोसले आणि संजय जगदाळे आहेत. तसेच कार्यकारी निर्माते महेश भारांबे, अन्वय नायकोडी आहेत. याशिवाय गुरु ठाकूर आणि क्षितीज पटवर्धन यांनी गीत लिहिले आहेत. ज्याला अमितराज यांनी संगीत दिले आहे.
Discussion about this post