हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दिग्दर्शक केदार शिंदे यांचा ‘महाराष्ट्र शाहीर’ हा बहुप्रतीक्षित चित्रपट आजच राज्यभरात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातून महाराष्ट्राच्या मातीतील लोककलावंत कृष्णराव गणपतराव साबळे अर्थात लाडके शाहीर साबळे यांची जीवनगाथा रुपेरी पडद्यावर अली आहे. यानंतर आता स्त्रियांवर आधारलेला’बाईपण भारी देवा हा चित्रपट येऊ घातला आहे. आज ‘महाराष्ट्र शाहीर’ प्रदर्शित झाला तर दुसरीकडे ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला आहे.
केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ या आगामी चित्रपटाचा टिझर नुकताच रिलीज झाला असून चांगलाच व्हायरल होत आहे. प्रेक्षक या टिझर व्हिडिओला तुफान पसंती देत आहेत. ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट आपल्या आयुष्यातील प्रत्येक ‘ती’च्या विश्वाभोवती फिरणारा आहे. मग ती आई, आजी, सासू, काकी, मावशी, ताई, आत्या, मामी कुणीही असो. तिच्या भावनांचे दर्शन घडवणारे आणि डोळ्यात अंजन घालणारा हा चित्रपट आहे. अर्थात या चित्रपटाचे कथानक महिलांभोवती फिरणारे आहे आणि त्यांच्याशी जोडलेल्या प्रत्येकाच्या आयुष्यावर आधारित आहे.
एकंदरच काय तर हा चित्रपट स्त्रियांच्या आयुष्यातील प्रत्येक पुरुषाचे कान टोचून जाणारा आहे. जिओ स्टुडिओज प्रस्तुत, माधुरी भोसले आणि जिओ स्टुडिओज निर्मित, बेला शिंदे- अजित भुरे सह- निर्मित आणि केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट येत्या ३० जून २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातून रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर आणि दीपा परब या मातब्बर अभिनेत्री एकत्र रुपेरी पडदा गाजवणार आहेत.
Discussion about this post