हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘चित्राक्ष फिल्म्स’ आणि ‘स्माईल स्टोन स्टुडिओ’ प्रस्तुत ‘TDM’ असा एक कॉमेडी जॉनरचा नवाकोरा मराठमोळा चित्रपट लवकरच येत आहे. या चित्रपटाची ‘ख्वाडा’ आणि ‘बबन’ चित्रपटाचे निर्माते आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे करत आहेत. तर चित्रपटाची कथा, संवाद, स्क्रीनप्ले बी. देवकाते आणि भाऊरावांनी एकत्र खांद्यावर पेलली आहे. या चित्रपटाचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला असून रसिक प्रेक्षकांना ३ फेब्रुवारी २०२३ रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये पाहता येईल. या चित्रपटाची कथा काहीशी वेगळी आणि संभ्रमात टाकणारी आहे. पण तरीही याचा टिझर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्याचे दिसत आहे.
या टिझरमध्ये दिसत आहे कि, पिळदार शरीरयष्ठी असलेला एक तरुण जड काम करत आहे. तो खाणीत एकट्याने काम करून घेत असलेली मेहनत, गाळत असलेला घाम आणि त्याचे कष्ट कोणालाही दिसत नाहीत. कुणीच त्याला मदत करत नाही. हा चित्रपट एका वास्तविक मुद्द्याकडे लक्ष ओढतो. विशेष म्हणजे चित्रपटाचा टिझर रिलीज झालाय पण यात मुख्य नायकाचा चेहरा दाखवलेला नाही. त्यामुळे चित्रपटात कोण आहे याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे. या चित्रपटाची कथा वास्तविक असली तरी भावनिक वळण घेते का…? हे चित्रपट पाहिल्यावरच कळेल.
या चित्रपटाबाबत बोलताना भाऊराव कऱ्हाडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ते म्हणाले की, ‘ ‘बबन’ चित्रपटानंतर बऱ्याच दिवसांनी मी नवीन सिनेमा घेऊन रसिकांच्या भेटीला येतोय. मधल्या काळात लॉकडाऊनमुळे सिनेमात एकंदरीतच मनोरंजन क्षेत्रात बऱ्याच घडामोडी झाल्या. त्यामुळे बराच काळ गेला. पण आता प्रेक्षकांना जास्त वाट पाहावी लागणार नाही. तुमच प्रेम, आशीर्वाद सदैव माझ्यावर आहेत. येत्या ३ फेब्रुवारी २०२३ ला,आम्ही घेऊन येतोय तुमचा सिनेमा ‘टीडीएम’. अपेक्षा करतो की माझ्या मायबाप प्रेक्षकांना हा उत्कंठावर्धक टिझर नक्कीच भावेल. तुमच्या आवडीच्या गोष्टी लवकरच पडद्यावर आणू.’
Discussion about this post