हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दहशतवाद्यांचं भीषण सत्य जगासमोर आणणाऱ्या ‘फराज’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटातून बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचा नातू जहान कपूर आणि परेश रावल यांचा मुलगा आदित्य रावल अभिनय सृष्टीत पदार्पण करत आहेत. या चित्रपटाच्या ट्रेलरने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. ‘फराज’चा ट्रेलर साधारण २ मिनिट ६ सेकंद इतका आहे. या सिनेमाच्या कथानकामध्ये, तरुण दहशतवाद्यांचा एक समूह आहे जो एका महागड्या कॅफेमध्ये नरसंहार घडवताना दिसत आहे. हा चित्रपट येत्या ३ फेब्रुवारी २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे.
या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये काही संवाद ऐकू येत आहेत. जे तुमच्या मनाला हेलावून टाकतील. यामध्ये एक संवाद आहे ज्यात दहशतवादी त्यांचं मिशन पूर्ण करताना म्हणतो, ‘इस्लाम धोक्यात आहे.’ यावर फराज त्याला सुनावतो कि, ‘गप्प बस, आमची ओळख फक्त आमच्या धर्मातूनच नाही तर आमच्या संस्कृतीतून होते. आधी माणूस व्हा, मग विचार करा की मुस्लिम असणं काय असतं.’ या ट्रेलरमध्ये दहशतवाद्यांवर जवान कारवाई करतानादेखील दिसत आहेत. ट्रेलर पाहून ‘फराज’च्या व्यक्तिरेखेला प्रेक्षक प्रचंड पसंती देताना दिसत आहे. आता प्रतीक्षा आहे ती चित्रपटाच्या प्रदर्शनाची.
या चित्रपटात परेश रावल यांचा मुलगा आदित्य मुख्य दहशतवाद्याच्या भूमिकेत आहे. तर फराजची भूमिका जहान कपूर साकारत आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन हंसल मेहता यांनी केले आहे. तर भूषण कुमार, अनुभव सिन्हा, साक्षी भट्ट, साहिल सहगल आणि मजहिर मंदसौरवाला यांनी ‘फराज’ या सिनेमाच्या निर्मितीची धुरा सांभाळली आहे. या चित्रपटात जहान कपूर आणि आदित्य रावल यांच्याशिवाय नाना पाटेकर, जुही बब्बर, आमिर अली, सचिन लालवानी, पलक लालवानी आणि रेशम सहानी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
Discussion about this post