हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांचा आगामी मराठी चित्रपट ‘महाराष्ट्र शाहीर’ सध्या प्रचंड चर्चेत आहे. याचे कारण हा चित्रपट केवळ एक कथाकथन नसून एक उत्कट भावना आहे. जनतेला चेतावणाऱ्या आणि भावनांना पेटवणाऱ्या शाहिराची हि यशोगाथा आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या घोषणेपासूनच प्रेक्षकांच्या मनातली उत्सुकता मोठी आहे. सह्याद्रीचा सिंह.. जना मनातला आवाज.. आणि मातीतला अस्सल लोककलावंत स्वर्गीय कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाचा दमदार ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. जो पाहून चित्रपटाच्या प्रदर्शनाची प्रत्येकालाच ओढ लागली आहे.
या चित्रपटाच्या टीझरला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिल्यानंतर आता ट्रेलर लक्ष वेधून घेतो आहे. ‘एव्हरेस्ट मराठी’च्या युट्यूब चॅनलवर ३ मिनिटे ९ सेकंदाचा हा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. या ट्रेलरमधून आपण शाहीर साबळे यांच्या आयुष्यातील लहानातलय लहान टप्प्यांची झलक पाहू शकतो. बालवस्था, किशोरवय, तारुण्य, प्रपंच, राजकारण ते समाजकारणाच्या विविध छटांवर या चित्रपटात प्रकाश टाकण्यात आला आहे. लहानगा किसना ते महाराष्ट्राचे लाडके शाहीर हा अभूतपपूर्व प्रवास या चित्रपटात आपण पाहणार आहोत. ट्रेलरमध्ये अंकुश चौधरीने साकारलेले शाहीर आपले लक्ष वेधून घेत आहेत.
सोबतच या ट्रेलरमध्ये शाहीर कसा असतो.. ? याची उत्तम व्याख्या कथन केली आहे. शाहिरांच्या ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या स्फूर्तिगीताचे संयुक्त महाराष्ट्र चळवळीतले महत्त्व आणि कलावंताने कलेला वाहिलेले जीवन अशा प्रत्येक महत्वपूर्ण गोष्टीची एक झलक यामध्ये प्रभावीपणे मांडले आहेत. तसेच शेवटी शाहिरांच्या हाती असलेली ‘महाराष्ट्राची लोकधारा’ न बोलता बरंच काही बोलून जाते. या चित्रपटातून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, यशवंतराव चव्हाण, साने गुरुजी, लता मंगेशकर यांचीदेखील झलक पहायला मिळणार आहे.
‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटाची प्रस्तुती एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंट आणि केदार शिंदे प्रॉडक्शन्स यांची आहे. तर चित्रपटाचे निर्माते संजय छाब्रिया आणि बेला केदार शिंदे हे आहेत. या चित्रपटाला अजय आणि अतुल या महाराष्ट्राच्या लाडक्या जोडीचे मंत्रमुग्ध करणारे संगीत लाभले आहे. याशिवाय चित्रपटाचे लेखन ज्येष्ठ लेखिका आणि दिग्दर्शिका प्रतिमा कुलकर्णी यांचे आहे. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे शाहीर साबळे यांची भूमिका अभिनेता अंकुश चौधरी आणि त्यांची पत्नी भानुमती साबळे हि भूमिका केदार शिंदेंची लेक सना शिंदे साकारते आहे. ‘महाराष्ट्र शाहीर’ हा बहुचर्चित चित्रपट २८ एप्रिल २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे.
Discussion about this post