हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। धमाकेदार गाणी आणि भन्नाट टिझर प्रदर्शित झाल्यानंतर आता श्रेयश जाधव दिग्दर्शित ‘फकाट’ चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर सोशल मीडियावर झळकला आहे. श्रेयश जाधव त्यांच्या प्रेक्षकांसाठी नेहमीच काहीतरी हटके विषय घेऊन येतात. चित्रपटाच्या ट्रेलरवरून हा सुद्धा एक वेगळाच चित्रपट असल्याचे दिसतेय. वक्रतुंड एन्टरटेनमेंट्स, गणराज स्टुडिओ प्रस्तुत, निता जाधव निर्मित या चित्रपटात हेमंत ढोमे, सुयोग गोऱ्हे, अविनाश नारकर, अनुजा साठे, रसिका सुनिल, नितीश चव्हाण, किरण गायकवाड, महेश जाधव आणि कबीर दुहान सिंग यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘फकाट’ येत्या १९ मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.
ट्रेलरमध्ये भारत -पाक युद्ध, विनोद, प्रेम असे सगळेच पाहायला मिळत आहे. एलओसी सारखा गंभीर विषय असतानाच हेमंत ढोमे आणि सुयोग गोऱ्हे यांची धमालही दिसतेय. घरच्यांनी आणि या दोघांनीही आपण काहीच करू शकत नसल्याची आशा सोडल्यानंतर अचानक हेमंत आणि सुयोगच्या हाती एक हायली कॅान्फिडेन्शिअल फाईल लागते आणि त्यानंतर ते त्या फाईलची काय विल्हेवाट लावतात, यादरम्यान त्यांना कोणकोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागते आणि त्यानंतर जो धिंगाणा होतो तो ‘फकाट’मध्ये पाहायला मिळणार आहे. ट्रेलरमध्ये अभिजीत खांडकेकर याचीही झलक दिसत आहे. त्यामुळे आता त्याची यात काय भूमिका आहे, हे ‘फकाट’ पाहिल्यावरच कळेल. ‘फकाट’च्या निमित्ताने कबीर दुहान सिंग मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहेत. तो नकारात्मक भूमिकेत दिसत असून त्याचा एक वेगळाच दरारा या चित्रपटात दिसत आहे.
चित्रपटाबद्दल दिग्दर्शक श्रेयश जाधव म्हणतात, ‘’ हा एक धमाल मनोरंजन करणारा चित्रपट असून संपूर्ण कुटुंबाने एकत्र पाहावा, असा आहे. चित्रपटात या कलाकारांनी जो धिंगाणा घातला आहे, तो कमाल आहे. ‘फकाट’ विनोदी असला तरी यातून एक छान संदेशही देण्यात आला आहे. यात भारत पाकिस्तानचा संदर्भ आहे, मात्र कोणच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत, याची पूर्णपणे काळजी घेण्यात आली आहे. चित्रपटातील गाणीही संगीतप्रेमींना आवडतील अशीच आहेत.”
Discussion about this post