हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेता रितेश आणि जिनिलिया देशमुख यांच्या ‘वेड’ ने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली. या चित्रपटाने प्रेक्षकांसह सर्वांना अक्षरशः वेड लावले. या सिनेमाने आतापर्यंत एकूण ७० कोटींपेक्षा जास्त कमाई केली असून भरभरून यश मिळाल्यानंतर रितेश आणि जिनिलियाने त्यांच्या चाहत्यांसाठी व्हेलेंटाईन डे निम्मित खास गिफ़्ट दिलं आहे. त्यांनी व्हेलेंटाईन डे निम्मित फक्त 99 रुपयांत चित्रपट दाखवण्यात येईल, अशी मोठी घोषणा केली आहे.
अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलिया डिसोजा देशमुख यांच्याकडून अधिकृत इंस्टाग्रामच्या माध्यमातून नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्र भरातील सिनेमा थिएटरमध्ये एकाच किमतीत हा सुपरहिट चित्रपट दाखवण्यात येईल, असे रितेशने म्हटले आहे. यानुसार उद्या दिनांक १३ फेब्रुवारी २०२३ ते १६ फेब्रुवारी २०२३ दरम्यान ‘वेड’ सिनेमा ९९ रुपयांत महाराष्ट्रभरातील थिएटर्समध्ये दाखवण्यात येईल. हे खास ‘व्हॅलेंटाइन स्पेशल गिफ्ट’ असल्याचे रितेशने पोस्टमध्ये म्हटलं आहे.
रितेश आणि जिनिलिया यांचा ‘वेड’ हा ३० डिसेंबर २०२३ रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाने एकूण ७० कोटींचा आकडा पार केला. मराठीमध्ये सर्वाधिक कमाई करणारा हा दुसरा सिनेमा ठरला. प्रेक्षकांनी या चित्रपटाला अक्षरशः डोक्यावर घेतले. विशेष म्हणजे यातील ‘मला वेड लावलंय लावलंय…’ हे गाणे प्रत्येकाच्या तोंडी उमटत आहे. अनेकजण यावर रिल्स देखील बनवू लागले आहेत.
Discussion about this post