हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या सोशल मिडीयावर आगामी ऐतिहासिक चित्रपट ‘हर हर महादेव’ची जोरदार चर्चा रंगली आहे. याचे कारण म्हणजे चित्रपटातील भूमिका, संवाद, थरार उभे करणारे प्रसंग आणि नरवीर झुंझार बाजी. आजवर अनेक ऐतिहासिक चित्रपट या सिने सृष्टीने पाहिले. पण न उलगडलेले बाजी हे सुवर्ण पान कुठेतरी राहिलेच होते. हाच सुवर्ण इतिहासाचा अध्याय आता महाराष्ट्र गाजवण्यास सज्ज आहे. अलीकडेच या चित्रपटाच्या टीझरने सर्वत्र धुमाकूळ घातला. यानंतर आता आणखी एक टिझर प्रदर्शित केला गेलाय. जो पाहून तुमच्याही अंगावर काटा उभा राहिला नाही तर नवलंच!
दिग्दर्शक अभिजित देशपांडे दिग्दर्शित ‘हर हर महादेव’ या चित्रपटाचा हा दुसरा टिझर असून यालाही प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. निर्मात्यांनी शरद केळकर यांनी साकारलेल्या बाजीप्रभूंच्या दमदार, कणखर आणि झुंझार व्यक्तिरेखेने प्रभावित करणारा हा दुसरा टिझर प्रदर्शित केला आहे. यामध्ये बाजीप्रभूंच्या नेतृत्वाखाली झालेल्या पावणखिंडीच्या थरारक प्रसंगाची झलक दाखवण्यात आली आहे. हा इतिहासाचा असा अध्याय आहे जो प्रभू रामावर जशी हनुमंताची निष्ठा होती तशीच निष्ठा बाजीप्रभूंची शिवरायांवर होती हे दर्शवतो.
बाजीप्रभूंच्या नेतृत्वात केवळ ३०० सैनिकांनी यूदधातील विजयासाठी आपले सर्वस्व पणाला लावले आणि १२००० शत्रू सैन्याविरुद्ध जोरदार लढा दिला. अखेर.. विजय झाला. हि कथा अतिशय प्रेरणादायी आणि थरारक आहे. या टीझरमध्ये दाखवलेले प्रसंग आणि संवादासह गर्जना थेट काळजाला भिडतेय. भारताचा इतिहास प्रत्येकाला कळावा म्हणून हा चित्रपट ५ विविध भाषांतून प्रदर्शित होत आहे. अभिजीत देशपांडे यांचे लेखन आणि दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाची निर्मिती सुनील फडतरे यांच्या श्री गणेश मार्केटिंग अँड फिल्म्स’ने केली आहे. येत्या दिवाळीत २५ ऑक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित होईल. यामध्ये शिवरायांच्या भूमिकेत सुबोध भावे तर त्यांच्या पत्नी महाराणी सईबाईंच्या भूमिकेत सायली संजीव दिसणार आहे. तसेच बाजीप्रभूंच्या भूमिकेत शरद केळकर आणि त्यांच्या पत्नी सोनाबाईंच्या भूमिकेत अभिनेत्री अमृता खानविलकर दिसणार आहे. याशिवाय आबाजी विश्वनाथ यांच्या भूमिकेत हार्दिक जोशी दिसणार आहे.
Discussion about this post