हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी मराठी वाहिनीवरील अत्यंत लोकप्रिय कॉमेडी शो ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या माध्यमातून प्रकाशझोतात आलेला अभिनेता ओंकार भोजने हा प्रेक्षकांचा अत्यंत लाडका कलाकार आहे. त्याने आपल्या परफेक्ट कॉमिक टायमिंग आणि निखळ अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली आहे. हास्यजत्रा सोडून फु बाई फु मध्ये सामील झाल्यानंतर ओंकारवर टीका झाल्या मात्र त्याने काही मागे वळून पाहिलं नाही.
उलट सच्च्या चाहत्यांच्या साथीने तो ‘सरला एक कोटी’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसला. यानंतर आता ‘करून गेलो गाव’ या नाटकातून भाऊ कदमसोबत तो रंगभूमी गाजवताना दिसतोय. या नाटकाच्या प्रयोगादरम्यान त्याने स्वतःची ‘तू दूर का’ हि कविता सादर केली आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
मराठी कॉमिक अभिनेता ओंकार भोजने याने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडल इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. ओंकार भोजने आणि भाऊ कदम यांची जोडी ‘करून गेलो गाव’ या नाटकातून प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करत आहेत. याच नाटकाच्या एका प्रयोगादरम्यान ओंकारने प्रेक्षकांच्या आग्रहाखातर ‘तू दूर का’ हि कविता म्हटली आहे. अनेकदा त्याला विविध ठिकाणी, विविध प्रसंगी या कवितेचे सादरीकरण करण्याची विनंती केली जाते. यावेळी नाटकाच्या प्रयोगादरम्यान हि कविता ओंकार सादर करताना दिसला. ही कविता ऐकताना उपस्थित प्रेक्षक वर्ग अक्षरशः भारावून गेला होता.
सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच वायरल होतोय आणि यावर अनेक नेटकरी विविध प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. एका नेटकऱ्याने यावर कमेंट करताना लिहिले आहे कि, ‘असं म्हणतात “दुःख” माणसाकडून काहीतरी क्रिएटिव्ह घडवत असतं.. तुझी “तू दुर का” ही कविता ही अशीच आहे.. तूझ्या दुःखाने ही कविता रचली आहे जी आम्हाला ही त्यात सामील करून घेत आहे..’. तर आणखी एकाने म्हटलं कि, ‘पाहण्या तुला मन हे आतुर का… ओ या आता… असं एकदा तरी गोस्वामी सरांनी म्हणावं आणि तुम्ही पुन्हा एकदा यावं…. खूप वाट पाहत आहे आम्ही सर्व तुमची सर….’. तसेच आणखी एकाने लिहीलंय, ‘एक चिपळूणकर म्हणून तुझा खुप खुप अभिमान आहे मित्रा…. पण तुझी ही कविता अख्ख्या महाराष्ट्राने डोक्यावर घेतलीये. चाल, शब्द आणि भावना एकदम हडस..’.
Discussion about this post