हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे हे एक मराठी लोकशाहीर म्हणून प्रसिद्ध होते. आपल्या पोवाड्यांमधून ते गावोगावी स्वातंत्र्य चळवळीची ज्योत पेटवत होते. त्यांचे भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत आणि संयुक्त महाराष्ट्रासाठी झालेल्या चळवळीत शाहीर म्हणून फार मोठे योगदान आहे.
त्यामुळे शाहिरांच्या जीवनाबाबत प्रत्येकाला ठाऊक असायला हवं हि एव्हढीच इच्छा उराशी बाळगून केदार शिंदे यांनी शाहिरांचा जीवनपट तयार केला आहे. ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी केवळ १०० दिवस बाकी आहेत आणि याबाबत व्यक्त होताना केदार शिंदे यांनी एक व्हिडीओ पोस्ट शेअर केली आहे.
केदार शिंदे यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘एका सिनेमासाठी ३ वर्ष तयारी करताना काळ किती भरभर निघून जातो हे कळतच नाही.. कालचीच गोष्ट वाटते जेव्हा ही कल्पना डोक्यात आली.. आता आतच तर स्क्रिप्ट वर काम सुरू होतं.. लोकेशन शोधायला फिरलो त्याची माती अजूनही बुटांवर आहे आणि महाराष्ट्रातल्या अनेक देवळांची दर्शनं घेतली त्याची फुलं सुद्धा सुकली नसतील.. हे सगळं शक्य झालं ते दोन गोष्टींमुळे – १) शाहीर साबळे म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचे बाबा, ह्यांच्यावर आणि त्यांच्या कार्यावर असलेलं प्रेम आणि २) तुम्हा मायबाप रसिक प्रेक्षकांना काहीतरी दर्जेदार आणि उत्तम देण्याची असलेली इच्छा.. ह्या प्रवासातला एक महत्वाचा टप्पा आलेला आहे.. एक बहुआयामी कलावंत असणाऱ्या शाहिरांचा झंझावाती जीवनपट ‘महाराष्ट्र शाहीर’ पडद्यावर येण्यासाठी अजून फक्त १०० दिवस बाकी आहेत.. भेटू लवकरच.. फक्त सिनेमागृहात!!’
येत्या २८ एप्रिल २०२३ रोजी ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट केवळ एक कथा नसून एक जीवनपट आहे. त्यामुळे यातील प्रत्येक प्रसंग अतिशय बारकाईने मांडण्यात आला आहे. प्रत्येक प्रसंगातील भावना आणि वेदना अत्यंत उत्कटपणे मांडण्याचा प्रयत्न शिंदे यांनी केला आहे. आपले आजोबा कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे यांचा जीवनपट तयार करणे हे केदार शिंदे यांचे स्वप्न होते आणि लवकरच हे स्वप्न सत्यात साकारून आपल्यालाही अनुभवता येणार आहे. शाहीर हे कुणा एकाचे नव्हते संपूर्ण महाराष्ट्राचे होते आणि म्हणूनच या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता आहे.
Discussion about this post