हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। या वर्षाच्या अगदी सुरुवातीलाच ‘पांडू’ या चित्रपटाची घोषणा झाली होती आणि तेव्हापासून दादा कोंडकेंनंतर हे पात्र साकारणार कोण असा एक मोठा प्रश्न पडला होता. तर आम्हाला हे सांगायला आनंद होतोय कि ‘पांडू’ आणि ‘महादू’ची जोडी ठरलीसुद्धा आणि प्रेक्षकांचे मनोरंजन करायला सज्ज झालीसुद्धा. होय. विनोदाचे २ अवली बादशाह एक ‘भाऊ कदम’ ‘पांडू’ च्या भूमिकेत तर दुसरा कुशल बद्रिके ‘महादू’च्या भूमिकेत दिसणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीजर रिलीज झाला आहे आणि सर्वत्र चर्चा सुरु झाल्या आहेत.
या चित्रपटात ‘पांडू’ ही मुख्य व्यक्तिरेखा भाऊ कदम साकारत आहेत. या भूमिकेबद्दल बोलतांना भाऊ म्हणतो, ‘सध्याच्या या तणावाच्या परिस्थितीत प्रेक्षकांना मनोरंजनाच्या दोन घटका देणे आणि त्यांचा ताण हलका करणे यासारखं पुण्याचं काम दुसरं काहीच नाहीये. ‘पांडू’ प्रेक्षकांची ही गरज शंभर टक्के पूर्ण करेल असा मला विश्वास आहे. दिग्दर्शक विजू मानेंसोबत काम करण्याचा अनुभव कायमच मजेशीर राहिलेला आहे आणि सोबतीला कुशल असल्यामुळे ही केमिस्ट्री अजूनच चांगली खुलून आली आहे. ही भूमिका साकारणं माझ्यासाठी फार मोठी आणि महत्वाची बाब आहे.”
तर महादू या भूमिकेविषयी बोलताना कुशल म्हणतो, ‘मी या चित्रपटात महादू हवालदाराची भूमिका साकारतोय. मी आणि भाऊ, आम्ही आजवर विविध माध्यमांतून लोकांचं मनोरंजन केलंय. हीच परंपरा हाही चित्रपट कायम ठेवेल यात शंकाच नाही. गेल्या २१ वर्षात आमच्यातली मैत्री खूप घट्ट विणली गेलीये आणि हीच मैत्री पांडू आणि महादू’च्या निमित्ताने प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर अनुभवायला मिळणार आहे. अशात ‘पांडू’सारखा चित्रपट प्रेक्षकांना नुसतं हसवणारच नाही तर एक नवी ऊर्जाही देईल हा विश्वास मला आणि आमच्या संपूर्ण टीमला आहे.”
दादा कोंडकेंचा सदाबहार चित्रपट पांडू आता आधुनिकरीत्या मनोरंजन करण्यास सज्ज आहे. सोबत झी स्टुडिओजची निर्मिती आणि विजू माने यांचे दिग्दर्शन हि एक महत्वाची पर्वणी असणार आहे. ‘पांडू’ हा चित्रपट येत्या ३ डिसेंबरला थिएटरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. तसेच या चित्रपटाला अवधूत गुप्तेंच्या संगीताची साथ लाभली आहे. असे एक मनोरंजनाचे परिपूर्ण पॅकेज म्हणजेच ‘पांडू’ हा येत्या ३ डिसेंबर २०२१ रोजी प्रदर्शित होत आहे.
Discussion about this post