हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। पुनित बालन ग्रुप आयोजित मराठी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार, दिग्दर्शक आणि दिग्गज कलाकार यांचा सहभाग असलेल्या ‘पुनित बालन सेलिब्रीटी लीग- २’ क्रिकेट स्पर्धेत पन्हाळा जॅग्वॉर्स या संघाने सलग २ विजय मिळवले आहेत. तर रायगड पँथर्स संघाने सनसनाटी विजय मिळवत स्पर्धेत गुणांचे खाते उघडले. पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियम स्वारगेट येथे सुरू असलेल्या या क्रिकेट स्पर्धेत कर्णधार जय दुधाणेच्या धडाकेबाज अर्धशतकी खेळीच्या जोरावर पन्हाळा जॅग्वॉर्सने प्रतापगड टायगर्सचा २५ धावांनी पराभव करून सलग दुसरा विजय मिळवला. पहिल्यांदा फलंदाजी करताना पन्हाळा जॅग्वॉर्सने ११३ धावांचे आव्हान उभे केले. कर्णधार जय दुधाणेने ५७ धावांची तर अमित खेडेकरने ३१ धावांची खेळी केली. या आव्हानाला उत्तर देताना प्रतापगड टायगर्सचा डाव ८८ धावांवर मर्यादित राहीला. विनय राऊल याने नाबाद ३२ धावांची तर हृषीकेश जोशी यांनी २२ धावांची खेळी केली.
अखेरच्या चेंडूपर्यंत रंगतदार झालेल्या सामन्यात अजिंक्य जाधवच्या खेळीमुळे रायगड पँथर्स संघाने प्रतापगड टायगर्सचा ४ गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना प्रतापगड टायगर्सने १० षटकात ११० धावा पटकावल्या. विनय राऊळ (३६ धावा), हृषीकेश जोशी (३२ धावा) यांच्या फलंदाजीमुळे संघाने शंभरपेक्षा जास्त धावा धावफलकावर लावल्या. अजिंक्य जाधव (२६ धावा), अर्थव वाघ (२६ धावा) आणि ऋतुराज फडके (नाबाद २४ धावा) यांच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे रायगड पँथर्सने हे आव्हान ९.५ षटकात पूर्ण केले आणि स्पर्धेत संघाचे खाते उघडले.
सिद्धांत मुळेच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर पन्हाळा जॅग्वॉर्स संघाने शिवनेरी रॉयल्स् संघाचा ९ धावांनी पराभव करून विजयी सलामी दिली. पहिल्यांदा फलंदाजी करताना हार्दीक जोशी (२० धावा), सिद्धांत मुळे (१७ धावा) आणि आकाश पेंढारकर (१४ धावा) यांच्या फलंदाजीच्या जोरावर पन्हाळा जॅग्वॉर्स संघाने १० षटकात ८५ धावांचे आव्हान उभे केले. या आव्हानासमोर शिवनेरी रॉयल्स् संघाचा डाव ७६ धावांवर मर्यादित राहीला. संदीप जुवाटकर (२३ धावा), कृणाल पाटील (१८ धावा) आणि अभिजीत कवठाळकर (१३ धावा) यांची खेळी संघाचा पराभव वाचवू शकली नाही.
० सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरी
*पन्हाळा जॅग्वॉर्सः १० षटकात ५ गडी बाद ८५ धावा (हार्दीक जोशी २०, सिद्धांत मुळे १७, आकाश पेंढारकर १४, अभिजीत कवठाळकर १-१०, आशुतोष गोखले १-१२) वि. वि. *शिवनेरी रॉयल्स्ः १० षटकात ४ गडी बाद ७६ धावा (संदीप जुवाटकर २३, कृणाल पाटील १८, अभिजीत कवठाळकर १३, अक्षय वाघमारे २-१२);
सामनावीरः सिद्धांत मुळे.
*प्रतापगड टायगर्सः १० षटकात ३ गडी बाद ११० धावा (विनय राऊळ ३६ (३०, ४ चौकार, २ षटकार), हृषीकेश जोशी ३२ (२४, ३ चौकार), अजिंक्य जाधव १-१७, राया अभ्यंकर १-६) पराभूत वि. *रायगड पँथर्सः ९.५ षटकात ६ गडी बाद १११ धावा (अजिंक्य जाधव २६ (१८, २ चौकार, २ षटकार), अर्थव वाघ २६ (१७, ४ चौकार), ऋतुराज फडके नाबाद २४ (११, ३ चौकार, १ षटकार), राहूल गोरे २-२३, विवेक गोरे १-६);
सामनावीरः अजिंक्य जाधव.
*पन्हाळा जॅग्वॉर्सः १० षटकात ३ गडी बाद ११३ धावा (जय दुधाणे ५७ (३०, १ चौकार, ५ षटकार), अमित खेडेकर ३१ (२१, २ चौकार), राहूल गोरे २-३१) वि.वि. *प्रतापगड टायगर्सः १० षटकात ३ गडी बाद ८८ धावा (विनय राऊल नाबाद ३२ (१६, २ चौकार, १ षटकार), हृषीकेश जोशी २२, आदिश वैद्य १४, जय दुधाणे १-१२);
सामनावीरः जय दुधाणे.
Discussion about this post