हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता पंकज त्रिपाठी आणि मराठी सिनेविश्वातील लोकप्रिय दिग्दर्शक रवी जाधव यांनी नुकतीच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली आहे. या भेटीमागे एक खास कारण आहे. ते कारण काय हे सांगण्यासाठी रवी जाधव यांनी आवर्जून एक पोस्ट शेयर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी ही भेट अत्यंत खास असल्याचे सांगितले आहे. या भेटी दरम्यान रवी जाधव, पंकज त्रिपाठी आणि योगी आदित्यनाथ यांनी ‘अटल बिहारी वाजपेयी’ यांच्या जीवनावर एकत्र चर्चा केली.
रवी जाधव दिग्दर्शित आणि पंकज त्रिपाठी अभिनित ‘अटल’ हा चित्रपट लवकरच येणार आहे. भारताचे माजी पंतप्रधान, एक मितभाषी नेतृत्व, कवी आणि संवेदनशील व्यक्तिमत्व अशी ख्याती असलेल्या अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारलेला असणार आहे. या चित्रपटात प्रसिद्ध अभिनेता पंकज त्रिपाठी हे अटल बिहारी वाजपेयी यांच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. काही महिन्यांपूर्वीच या चित्रपटाचे अटलजींच्या जयंती निमित्त या चित्रपटाचे नाव आणि पंकज त्रिपाठी यांचा फर्स्ट लुक समोर आला होता.
‘अटल’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असून याच निमित्ताने अटल बिहारी वाजपेयी यांच्याविषयी काही खास गोष्टी जाणून घेण्यासाठी दिग्दर्शक आणि अभिनेत्याने योगीजींची भेट घेतली. या भेटीबाबत दिग्दर्शक रवी जाधव यांनी एक पोस्ट शेयर करताना लिहिले आहे की, ‘योगी आदित्यनाथ यांना भेटणं हा अत्यंत सुखद अनुभव होता. त्यांच्याकडून अटलजींचे विचार ऐकण्याची संधी आम्हाला मिळाली आणि चित्रपटाला खूप साऱ्या शुभेच्छा ही मिळाली.’
तर चित्रपटाचे शूटिंग सुरु झाल्याचे सांगताना पंकज त्रिपाठी यांनी एक पोस्ट शेअर करत लिहिले आहे कि, ‘अटलजी आणि लखनऊची गोष्ट खूप प्रसिद्ध आहे. आता त्यांच्या चरित्राचा भाग होणार! लखनऊमध्ये #MainAtalHoon साठी चित्रीकरण सुरू झाले!’
Discussion about this post