टीम, हॅलो बॉलीवूड । आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत राहणाऱ्या पायल रोहतगीने काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये तिने भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याविषयी वादग्रस्त विधानं केली होती. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. याप्रकरणी राजस्थानमधील बुंदी जिल्ह्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आयटी कायद्यासह अन्य कलमांखाली तिला अटक करण्यात आली.
“तुरुंगात खूप थंडी होती आणि त्या तुरुंगातील खोल्या सुद्धा अस्वच्छ होत्या. मी त्यारात्री खूप घाबरले होते. मी थंड जमिनीवर चटई अंथरुन झोपले होते. पण मला रात्रभर झोप लागली नाही. मी आशा करते की हा तुरुंगामधील अनुभव माझ्या आयुष्यातील शेवटचा अनुभव असावा“, असे पायल म्हणाली. अभिनेत्री पायल रोहतगीने भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे वडील आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष मोतीलाल नेहरू यांच्याविषयीचा एक व्हिडीओ केला होता. याप्रकरणात राजस्थान पोलिसांनी तिला अहमदाबाद येथून १५ डिसेंबर रोजी अटक केली होती.
या प्रकरणी पायल रोहतगीला न्यायालयाकडून जामीन मिळाला आहे. प्रसारमाध्यामांशी बोलताना पायल म्हणाली, “मी महिला जनरल वॉर्डमध्ये होते. तेथे अनेक महिला होत्या आणि त्यांनी त्यांचा अनुभव माझ्यासोबत शेअर केला. त्यांच्या गोष्टी ऐकून मी भावूक झाले’ असे पायल पुढे म्हणाली. त्यानंतर तिने तिच्यासोबत ५ मोठ्या गुन्हातील गुन्हेगार असल्याचे सांगितले. ‘तुरुंगामधील जेवण अजिबात चांगले नव्हते. पण ज्या लोकांना तिखट आवडतं त्यांच्यासाठी ते ठिक होतं. तुरुंगामधून बाहेर आल्यानंतर मी खूप खूश आहे आणि त्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले त्यांची मी आभारी आहे“
पायल पुढे म्हणाली, ‘मला राजकारण करुन यात अडकवण्यात आले होते. मी नेहमीच देशाचा विचार करते आणि मी माझ्या देशाचा इतिहास समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. पण मला चुकीच्या पद्धतीने तुरुंगामध्ये जायचे नव्हते.’
Discussion about this post