हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। जिची चर्चा गेल्या काही महिन्यापासून सर्वत्र आहे ती ‘फुलराणी’ आता थेट परदेशापर्यंत जाऊन पोहोचली आहे. भारतात प्रदर्शित होण्यापूर्वी हि ‘फुलराणी’ परदेशात फुलली आणि बहरलीसुद्धा. ‘ती फुलराणी’ या नाटकावर आधारीत हा मराठी चित्रपट कधी एकदा रिलीज होतो अशी सगळीकडे चर्चा असताना हा चित्रपट सातासमुद्रापार पोहोचला आणि पहिलाच शो हाऊसफुल झाला. त्यामुळे आता फुलराणीचा डंका परदेशात गाजतोय असे म्हणायला हरकत नाही. इतकंच काय तर ‘फुलराणी’चे पुढील सर्व प्रयोग देखील बघता बघता हाऊसफुल होण्याच्या दिशेने मार्गस्थ झाले आहेत.
‘फुलराणी’ अद्याप भारतात प्रदर्शित झालेला नाही मात्र परदेशात हा चित्रपट रिलीज झाला आहे. याची माहिती देणारी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. ज्यामध्ये लिहिलं आहे कि, ‘फक्त एका दिवसात सॅन फ्रान्सिस्कोच्या बे एरियातील ‘फुलराणी’चा पहिलाच शो हाऊसफुल झालाय!! येत्या आठवड्यापासून न्यू जर्सी, बॉस्टन आणि शिकागोतही बुकिंग ओपन होतंय..’ अशाप्रकारे ‘फुलराणी’ने परदेशात पंख पसरले आहेत. याचा नक्कीच मराठी प्रेक्षकांना अभिमान वाटत असेल यात काही शंका नाही. परदेशात तर फुलराणी फुलली आता महाराष्ट्रात ‘फुलराणी’च्या आगमनाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
‘ती फुलराणी’ हे मूळ नाटक पु.ल.देशपांडे यांनी जॉर्ज बर्नार्ड शॉ यांच्या पिग्मॅलियन या नाटकाचे केलेले मराठी रूपांतरण आहे. या नाटकात अभिनेतर भक्ती बर्वे यांनी मंजुळाची भूमिका साकारली होती. भक्ती बर्वे यांच्यानंतर प्रिया तेंडुलकर, सुकन्या कुलकर्णी, अमृता सुभाष, हेमांगी कवी यांनी हे नाटक जिवंत ठेवले. आता या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर फुलराणीच्या भूमिकेला न्याय देताना दिसणार आहे. हा चित्रपट गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अर्थात २२ मार्च २०२३ रोजी सर्वत्र चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. विश्वास जोशी दिग्दर्शित ‘फुलराणी…अविस्मरणीय प्रेम कहाणी’ या चित्रपटात सुबोध भावे आणि प्रियदर्शनी इंदलकर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. विश्वास जोशी, अमृता राव, श्वेता बापट या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. तर जाई जोशी, श्री.ए.राव, स्वानंद केळकर या चित्रपटाचे निर्माते आहेत.
Discussion about this post