हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील नामवंत दिग्दर्शक केदार शिंदे हे आपले आजोबा म्हणजेच शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवीत आहे. या चित्रपटाचे नाव ‘महाराष्ट्र शाहीर’ असून याचे चित्रीकरण अलीकडेच सुरु करण्यात आले आहे. शाहीर म्हणजे महाराष्ट्राची आन, बान आणि शान हे काही वेगळ्याने सांगणे नको. ज्यांनी लोककला जपली आणि पुढील पिढीला त्याचा वारसा दिला ते शाहीर आजही मनामनांत जिवंत आहेत. आगामी पिढीलाही शाहिरांचा रुतबा माहित व्हावा यासाठी हि कलाकृती बनवली जात आहे. दरम्यान ‘पसरणीच्या भैरी देवा..’ म्हणत ज्या शाहिरांनी या गावाचं नाव जगभर प्रसिद्ध केलं त्याच गावातील या पसरणीच्या भैरवनाथ मंदिरात शाहिरांचा फोटो लावून त्यांचा आदरपूर्वक सत्कार केला गेला.
केदार शिंदेनी या भारावून टाकणाऱ्या भावनिक प्रसंगाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ पोस्ट करताना सोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘पसरणीच्या भैरी देवा असं म्हणून ज्या गावाचं नाव बाबांनी (शाहिरांनी) संपूर्ण जगात प्रसिद्ध केलं त्या भैरवनाथ मंदिराच्या सभामंडपात शाहिरांचा फोटो लागावा ही इच्छा अनेक वर्ष आमच्या सगळ्यांच्या मनात होती.. महाराष्ट्र शाहीर ह्या सिनेमाचा प्रारंभ करताना ही इच्छा पूर्ण करण्याचा योग जुळून आला.. गेल्या ४ तारखेला, दसऱ्याच्या आदल्या दिवशी एका छोट्याशा पण जिवाभावाच्या लोकांनी सजलेल्या सोहळ्यात बाबांचा फोटो भैरवनाथ मंदिर पसरणी येथे अशा प्रकारे स्थानपन्न झाला!’
शाहीर साबळे यांच्या कारकिर्दीतील बराचसा काळ हा सातारा आणि वाईतील ठिकठिकाणी झाला. त्यामुळे चित्रपटाच्या चित्रीकरणात या भागांचा समावेश असणे अत्यंत आवश्यक होते. म्हणून केदार शिंदे यांनी स्वतः पायपीट करून चित्रीकरणासाठी विविध लोकेशन्सचा शोध घेतला आणि अखेर दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु झाले. या चित्रपटात शाहिरांच्या सानिध्यात बराच काळ घालवलेल्या अभिनेता अंकुश चौधरीने त्यांची भूमिका साकारण्याचे शिवधनुष्य हाती घेतले आहे. त्याच्या फर्स्ट लुकचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. ज्याला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. शिवाय या चित्रपटात शाहिरांच्या पत्नी सौ. भानुमती कृष्णराव साबळे यांच्या भूमिकेत त्यांची पणती म्हणजेच केदार शिंदेंची लेक सना शिंदे दिसणार आहे
Discussion about this post