हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। भारतीय सिनेसृष्टीत अनेक नावाजलेले कलाकार आणि तंत्रज्ञ आहेत. अनेकांची नाव नाही तर कामं बोलतात. अशाच हरहुन्नरी तंत्रज्ञांनी बनविलेला ‘घुम्या’ हा लघुपट सध्या फक्त देश नव्हे तर विदेशातही नाव कमावतोय. देशविदेशांतील प्रतिष्ठेच्या महोत्सवांमध्ये या लघुपटाला विशेष आणि सर्वोत्कृष्ट पुरस्कार मिळाले आहेत. समाज व्यवस्थेत दुय्यम स्थान दिल्या जाणाऱ्या जातीचा एक तरुण. जो मेलेले जनावर उचलण्याचे काम करतो आणि त्यातच त्याला मानसिक आजार होतो. परिस्थितीशी झगडणाऱ्या या तरुणाला एक व्यक्ती प्रलोभने दाखवून त्याचा धर्म बदलण्याचा प्रयत्न करतो. यापुढे सगळं काही बदलत.. पण कसं.? हेच या लघुपटाची कथा सांगते. ‘घुम्या’ हा लघुपट पुणेकर तरुणांनी तयार केला असून अतिशय गंभीर विषयावर तो भाष्य करतो.
‘घुम्या’ लघुपटाची निर्मिती सुशील भोर यांनी केली आहे तर कथा संतोष पवार यांची आहे. पटकथा व दिग्दर्शन राहुल लामखडे यांचे आहे आणि ‘घुम्या’ची अर्थात ‘बाळू’ची मध्यवर्ती भूमिका किशोर वाघमारे यांनी साकारली आहे. डॉ. संजय लकडे, निशा काथवटे, धनंजय सरदेशपांडे या कलाकारांनी अन्य महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. या लघुपटात एकच गाणे आहे जे गायक अभिजीत कोसंबी यांनी स्वतः लिहिले असून स्वतःच गायले आहे.
https://www.instagram.com/p/CZrCbIXuK1n/?utm_source=ig_web_copy_link
आपल्या कलाकृतीबद्दल बोलताना दिग्दर्शक राहुल लामखडे यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. एका वृत्त वाहिनीशी बोलताना ते म्हणाले कि, ‘संतोष पद्माकर पवार यांच्या काही कवितांचे आम्ही सादरीकरण करत असू. त्यातील ‘बाळू पिराजी’ नावाची कविता मी सादर करायचो. सत्य घटनेवर आधारलेली ही कविता आहे. या कवितेवर काहीतरी करायला हवे, या विचारातून लघुपटाची संकल्पना सुचली आणि म्हणून त्याची निर्मिती झाली. ग्रामीण भागात जातीवरून भेदभाव करण्याचे वास्तव आजही कायम आहे. पोटापाण्याचे प्रश्न सुटलेले नसताना धर्म आणि जातीच्या जंजाळात आपण अडकलेले आहोत, हे यात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. लघुपटातील मध्यवर्ती भूमिका नक्की ‘घुम्या’ आहे की आपणही ‘घुम्या’ ठरत आहोत, असा प्रश्न लघुपट पाहिल्यावर नक्कीच पडतो.’
https://www.instagram.com/p/CcW-sDYqOG5/?utm_source=ig_web_copy_link
‘घुम्या’ लघुपटाने मिळवलेले पुरस्कार –
१) १२ वा गंगटोक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव – विशेष उत्कृष्ट कामगिरी सन्मान, धर्मावर आधारित सर्वोत्कृष्ट चित्रपट
२) २७ वा टागोर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव – विशेष उत्कृष्ट कामगिरी सन्मान (लघुपट विभाग)
३) ५ वा कुकू आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार – सर्वोत्कृष्ट आभासी वास्तव पुरस्कार
४) भारतीय आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव – सर्वोत्कृष्ट मराठी लघुपट
Discussion about this post