हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा अलीकडेच प्रदर्शित झालेला ‘झुंड’ हा चित्रपट सत्य कथेवर आधारित असून एका वास्तवाशी जोडलेला आहे. झोपडपट्टीतील मुलं आणि तिथल्या लोकांचं आयुष्य यावर बेतलेला हा चित्रपट आज बॉक्स ऑफिसवर तुफान कामे करताना दिसतोय. दरम्यान नागराज मंजुळे यांची ओळख वास्तववादी कथांचे भाष्य करणारा आणि सत्य प्रखरतेने दर्शवणारा दिग्दर्शक आणि लेखक अशी काहीशी आहे. यामध्ये आता नागराज मंजुळे यांनी कविता आणि सिनेमांबाबत आपले मत मांडले आहे. पुणे कविसंमेलनात आणि कविसंमेलनानंतरच्या बैठकीत ते बोलत होते.
पुण्यातील काव्य संमेलनात उत्साहाने सामील होत नागराज मंजुळे यांनी आपले मन मोकळे केले आहे. दरम्यान त्यांची आपले मत प्रकट करताना म्हटले आहे कि, “जी आत्ता आहे ती संस्कृती हलकट आहे. पण तिचं वय खूप जुनं आहे आणि तुम्ही तिच्याशी जुन्याच शस्त्रांनी लढताय. कवितेने किंवा सिनेमांनी समाज बदलेल असं तुम्हाला वाटतं. पण लय भाबडे लोक आहात तुम्ही. तसं काही होणार नाही. पण आपण लढत रहायला हवं. मी कवितेतून किंवा सिनेमातून फक्त मोकळा होत असतो आणि त्याचे पैसेही मिळतात, ही गोष्ट मला खूप नंतर कळली. कवी होणं किंवा दिग्दर्शक होणं ही माझी कधीच महत्त्वाकांक्षा नव्हती. पण आतला जाळ मोकळा करत रहावं माणसांनी… लय थंडावा मिळतो जिवाला…”
नागराज मंजुळे हे जितके उत्तम लेखक, दिग्दर्शक तितकेच उत्तम कवी आहेत. त्यांच्या कवितादेखील कथानकाप्रमाणे मनाला धावणाऱ्या असतात. उन्हाच्या कटाविरूद्ध हा त्यांचा काव्यसंग्रहही प्रसिद्ध झाला आहे. त्याच्या अनेक कविता प्रसिद्ध आहेत. त्यातील एक कविता तुमच्यासाठी..,
माझ्या हाती नसती लेखणी तर…
तर असती छिन्नी, सतार, बासरी अथवा कुंचला
मी कशानेही उपसतच राहिलो असतो
हा अतोनात कोलाहल मनातला…
Discussion about this post