हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम असा आहे की, ज्याचे प्रत्येक वयोगटात चाहते आहेत. या कार्यक्रमाने मनोरंजन विश्वाला निखळ आणि अवलिया कलाकार दिले आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून समीर चौघुले, नम्रता संभेराव, वनिता खरात, गौरव मोरे, प्रसाद खांडेकर, चेतना भट, दत्तू मोरे यांसारखे हास्य तारे प्रेक्षकांच्या भेटीस आले आणि त्यांच्या आयुष्याचा भाग बनले. यामध्ये भांडुपकर निखिल बनेच्या नावाचादेखील समावेश आहे आणि म्हणूनच त्याच्या घरी पोलीस दाखल झाले होते.
अभिनेता निखिल बने याच्या कमाल कॉमिक टायमिंगमुळे तो प्रेक्षकांच्या मनात वसला आहे. त्याचे सोशल मीडियावर तुफान फॉलोवर्स आहेत आणि असे असूनही त्याच्या घरी पोलीस का गेले असतील..? असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. तर याच उत्तर स्वतः निखिलने एक पोस्ट शेअर करत दिले आहे. निखिलच्या घरी भांडुप पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस अधिकारी नितीन उनवणे गेले होते. निखिलने काही गुन्हा केलाय म्हणून नाही तर त्याच्या भेटीसाठी त्याचा चाहता बनून उनवणे त्याच्या भेटीसाठी गेले होते.
याबाबत निखिलने स्वतःच माहिती देणारी पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्याने आपल्या चाळीच्या राहत्या घरात आई, बाबा आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी नितीन उनवणे यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. सोबत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ‘आज भांडुप पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस अधिकारी (PI) श्री. नितीन उनवणे यांनी राहत्या घरी भेट दिली. माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी आनंदाचा क्षण. आमच्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाचे खूप मोठे चाहते’. यावेळी निखिलने शेअर केलेल्या फोटोत त्याच्या आई वडिलांच्या चेहऱ्यावर मुलासाठीचा अभिमान आणि आनंद अगदी स्पष्ट झळकत होता. या पोस्टवर त्याचे चाहते, मित्र आणि सहकलाकार मंडळींनी त्याचे कौतुक करणाऱ्या कमेंट्स केल्या आहेत.
Discussion about this post