हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम अतिशय लोकप्रिय ठरला आहे. या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या घराघरांत पोहोचलेले हास्य तारे ‘पोस्ट ऑफिस उघडं आहे’ या मालिकेतून एक नवी गोष्ट घेऊन आले. अतिशय वेगळा विषय आणि आशय घेऊन ही मालिका सुरु झाली आणि हळूहळू प्रेक्षकांच्या पसंतीस पडू लागली.
आता हि मालिका शेवटच्या भागाकडे मार्गस्थ झाली असून उद्या तो भाग प्रसारित होणार आहे. अर्थात सोनी मराठीची ‘पोस्ट ऑफिस उघड आहे’ हि मालिका उद्या प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. यामुळे प्रेक्षक भावुक झाले आहेत.
पोस्टाचं जेव्हा संगणकीकरण झालं तेव्हा नेमकं काय झालं आणि दरम्यान काय, कशा आणि किती अडचणी आल्या याचे भन्नाट सादरीकरण या मालिकेतून करण्यात आले आहे. नव्वदच्या दशकातले पोस्ट ऑफीस आणि आताचे पोस्ट ऑफिस यातला फरक दाखवणारी हि मालिका प्रेक्षकांना भावली ती कलाकारांच्या अभिनयामुळे आणि कथानकातील वास्तविकतेमुळे. गेल्या ३ महिन्यांपासून हि मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. पण आता शेवटी निरोपाची वेळ आलीच. या मालिकेचा शेवटचा भाग येत्या उद्या २ एप्रिल २०२३ रोजी प्रसारित होईल आणि मालिका संपेल अशी माहिती मिळाली आहे.
या मालिकेतून समीर चौघुले, वनिता खरात, शिवाली परब, प्रभाकर मोरे, दत्तू मोरे, ईशा डे, पृथ्वीक प्रताप, आशुतोष वाडेकर आणि दिग्गज अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी विविध भूमिका वठवल्या. आता शेवटच्या भागात असे दाखवण्यात आले आहे कि, ‘पोस्टामध्ये संगणक आले आणि सगळ्यांची दाणादाण उडाली. त्यात पोस्ट मास्तर कोण होणार..? यासाठी चुरस रंगली.
त्यामुळे अंतिम भागात आपण पोस्ट मास्तर पदाची शर्यत पाहणार आहोत. यावेळी गुळसकर आणि निरगुडकर यांच्यात पोस्ट मास्तर पदासाठी स्पर्धा रंगेल आणि शेवटी पारगाव पोस्टाची अंतिम परीक्षा होईल. यात कोण होणार पास आणि कोण घेईल मास्तरांची जागा हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. असे असले तरीही मालिकेने काही महिन्यांतच निरोप घेणे प्रेक्षकांच्या नाराजीचे कारण ठरले आहे.
Discussion about this post