हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही काळामध्ये आपण सारेच महाराष्ट्राच्या विस्कटलेल्या राजकारणाचे साक्षीदार झालो आहोत. पक्षापक्षांतील वाद आणि दुसऱ्यापेक्षा वरचढ होण्याची हाव नेहमीच राजकीय क्षेत्राला मलीनतेकडे नेते. गेल्या काही वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणाने देशाचेच नव्हे तर अवघ्या जगाचे लक्ष अशाच पद्धतीने वेधून घेतले आहे. अलीकडेच झालेला सत्ताबदल, राजकीय खेळीने पाडलेली फूट, डावपेच, तंटे हे सगळंच आपण पाहिलं. यावर काही चित्रपट, वेब सिरिज तयार करण्यासाठी अनेक दिग्दर्शक, निर्माते सज्ज झाले असताना आता अशाच आणखी एका चित्रपटाची घोषणा करण्यात आली. ज्याचे नाव चाणक्य आहे.
महाराष्ट्रात सुरु असलेल्या राजकीय नाट्याचा थरार घेऊन आगामी चित्रपट ‘चाणक्य’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. यामध्ये विस्कटलेलं राजकारण आणि राजकीय खेळी प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त निर्माता निलेश नवलाखा यांनी या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शनदेखील केले आहे. माहितीनुसार, हा चित्रपट येत्या २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे. तसेच हा चित्रपट मराठी आणि हिंदी अशा दोन मुख्य भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर विजयादशमी दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर लॉंच करण्यात आले आहे. जे अत्यंत लक्षवेधी आहे.
नवलाखा आर्ट्स मीडिया अँड एंटरटेनमेंटच्या माध्यमातून निलेश नवलाखा यांनी आतापर्यंत ‘शाळा’, ‘अनुमती’ आणि ‘फँड्री’ या राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपटांची निर्मिती केली आहे. यानंतर आता ‘चाणक्य’ चित्रपटाद्वारे निलेश नवलाखा दिग्दर्शक म्हणून पदार्पण करत आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणामुळे उद्ध्वस्त झालेल्या एका कुटुंबाची आणि राज्याच्या मुख्यमंत्री पदासाठी आखलेल्या कट-कारस्थानाची कथा तसेच राजकीय सूडनाट्य आणि गद्दारीची गोष्ट असा हा ‘चाणक्य’ प्रेक्षकांना भावणार असे वाटत आहे. या चित्रपटाविषयी नीलेश नवलाखा म्हणाले, की ‘चाणक्य’ या चित्रपटातून अत्यंत टोकदार राजकीय कथा मांडली जाणार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाचा हा चरित्रपट असेल. सत्तेसाठी सामान्यांच्या स्वप्नांचे बळी देऊन राज्य करणाऱ्या धुरंधरांची कथा मांडली जाणार आहे. या चित्रपटातील कलाकारांच्या नावाची घोषणा लवकरच करण्यात येईल.
Discussion about this post