हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दिवाळी आली कि सर्वत्र आनंद लहरी उठतात. हा सण रोषणाईचा आणि नात्यांचा असतो. कारण दिवाळीत सुगंधी उटणे, खमंग फराळ आणि नातेवाईकांची सरबराई सुरु असते. घरातील वातावरण अतिशय प्रफुल्लित आणि मनाला मोहणारे असते. त्यामुळे अशा सणाला गालबोट लागू नये याची प्रत्येकाने खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक असते. म्हणूनच सिने विश्वातील कलाकार मंडळी आपल्या चाहत्यांना सणाच्या शुभेच्छा आणि समाजाचे भान राखण्याचा संदेश देत असतात. असाच एक शुभेच्छापूर्वक संदेश प्राजक्ता माळीने दिला आहे.
मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने अधिकृत सोशल मीडिया इंस्टाग्राम हँडलवर ती होस्ट करत असलेल्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाच्या सेटवरील फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत तिने कॅप्शन लिहीत आपल्या तमाम चाहत्यांना आणि नेटकऱ्यांना दीपावली सणाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सोबतच ध्वनी आणि वायू प्रदूषण टाळण्याचा संदेश देत समाज भान राखण्याचा सल्लादेखील दिला आहे. तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘शुभ दिपावली.., .सणाचा मनसोक्त आनंद लूटा, फराळावर आडवा हात मारा, फटाके शक्यतो फोडू नका (ध्वनी आणि वायू प्रदूषण टाळा), आप्तेष्टांना भेटा, हसत रहा.. आणि हसण्यासाठी बघत रहा.’
प्राजक्ता माळीची हि पोस्ट सोशल मीडियावर बरीच चर्चेत आली आहे. तिच्या चाहत्यांनी तिच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. सोबतच अनेकांनी तिच्या पोस्टवर कमेंट करीत तिलाही दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाच्या दीपावली विशेष भागादरम्यान प्राजक्ताने हा फोटो क्लिक करून घेतला आहे. अतिशय मराठमोळ्या अंदाजातील तिचा हा फोटो चाहत्यांच्या मनाचा ठाव घेतोय. या फोटोमध्ये प्राजक्ताने गुलाबी रंगाची साडी परिधान केली आहे. तसेच लक्षवेधी दागिने, केसात गजरा माळला आहे. त्यामुळे तिच्या लूकची देखील बरीच प्रशंसा केली जात आहे.
Discussion about this post