हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अखेर महाराष्ट्रातील सत्ता नाट्य संपलं अशी म्हणायची वेळ जनतेवर आली. कारण गेल्या १० दिवसात महाराष्ट्राच्या राजकारणात अशी काही उलथापालथ झाली आहे कि, मुख्यमंत्री पदाचा चेहराच बदलला. शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर गुरुवारी ३० जून २०२२ रोजी बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर शिंदेंवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. दरम्यान ‘धर्मवीर’ चित्रपटात आनंद दिघे यांची भूमिका साकारणाऱ्या प्रसाद ओक यानेही शिंदेंना खास शुभेच्छा दिल्या आहेत.
मराठी सिनेइंडस्ट्रीतील आघाडीचा दिग्दर्शक आणि अभिनेता प्रसाद ओक याने शिवसेनेचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे आणि सोबत शुभेच्छा दिल्या आहेत. यात त्याने लिहिले आहे की, मा. मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब… मन: पूर्वक अभिनंदन आणि कोटी कोटी शुभेच्छा.’ याशिवाय दिग्दर्शक विजू माने यांनीसुद्धा एकनाथ शिंदे यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे आणि शुभेछया दिल्या आहेत. ‘ठाणे जिल्ह्याचे पहिले मुख्यमंत्री… एकनाथजी शिंदे… लई अभिमान..’ असे कॅप्शन त्यांनी या फोटोला दिले आहे.
ठाण्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून एक वेगळाच आनंद ठाणे शहरात साजरा केला जात आहे. कारण आनंद दिघे यांचे शिष्य म्हणून एकनाथ शिंदे यांची ख्याती आहे. दरम्यान धर्मवीर आनंद दिघे यांच्या चरित्रावर आधारलेला ‘धर्मवीर – मुक्काम पोस्ट ठाणे’ हा सिनेमा १३ मे रोजी प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाने महाराष्ट्रात दिघे नावाचं वादळ पुन्हा जागवलं. या चित्रपटातील दिघेंची भूमिका प्रसाद ओकने साकारली होती. त्याच मेकअप अतिशय हुबेहूब असल्यामुळे अनेकांना दिघे परत आल्याचा भास झाला होता. अगदी एकनाथ शिंदेंचे डोळेही पाणावले होते. त्यामुळे प्रसाद आणि शिंदेंचे नाते काही वेगळे आहे म्हणून या शुभेच्छा त्यांच्यासाठी खास आहेत.
Discussion about this post