हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची निवडणूक हा विषय गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेचा विषय ठरला होता. या निवडणुकीसाठी काल रविवारी दिनांक १६ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ९ ते संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान पार पडले. मुंबईत माटुंगा येथील यशवंत नाट्यमंदिर आणि गिरगावातील साहित्य संघ मंदिर या केंद्रांवर हे मतदान पार पडले. यानंतर रात्री मतमोजणी करून निकाल जाहीर करण्यात आला. निकानुसार, या निवडणुकीत प्रशांत दामले विजयी ठरले आहेत.
रविवारी रात्री उशिरापर्यंत मतमोजणी आणि फेरमोजणी झाली. यानंतर आज पहाटे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषेदच्या निवडणुकीचा निकाल जाहीर केला गेला. यामध्ये मुंबई मध्यवर्ती शाखेतील १० जागांपैकी एकूण ८ जागांवर प्रशांत दामलेंच्या ‘रंगकर्मी नाटक समूह’ पॅनलच्या उमेदवारांनी विजय मिळवला असून उर्वरित २ जागांवर प्रसाद कांबळींच्या ‘आपलं पॅनल’चे प्रसाद कांबळी आणि सुकन्या कुलकर्णी- मोने विजयी ठरले आहेत. तसेच मुंबई उपनगरांत २ जागा प्रशांत दामलेंच्या पॅनलकडे तर २ जागा प्रसाद कांबळींच्या पॅनलकडे गेल्या आहेत.
अभिनेते प्रशांत दामले यांनी काही दिवसांपूर्वीच आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलच्या माध्यमातून ‘रंगकर्मी नाटक समूह’ या पॅनलची माहिती सोशल मीडियाद्वारे दिली होती. त्यांच्या या पॅनलमध्ये अनेक दिग्गज कलाकारांचा समावेश आहे. विजय केंकरे, सयाजी शिंदे, सुशांत शेलार, विजय गोखले, अजित भुरे, वैजयंती आपटे, सविता मालपेकर हे या पॅनलचा भाग आहेत. तर प्रसाद कांबळी यांच्या ‘आपलं पॅनल’मध्ये सुकन्या मोने, राजन भिसे, ऐश्वर्या नारकर, अविनाश नारकर, अशोक नारकर, मंगेश कदम, सुनील देवळेकर, दिगंबर प्रभू, संतोष काणेकर यांचा समावेश आहे.
Discussion about this post