हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेविश्वातील प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक आणि लोकप्रिय अभिनेता प्रवीण तरडे हे जगभरातील मराठी व्यावसायिकांचे अनेकदा कौतुक करताना दिसतात. मराठी माणसाने जगभरात हातपाय पसरावे आणि यश संपादन करावे असे नेहमीच ते इतरांना प्रोत्साहित करताना दिसतात. जगभर फिरून तेथील मराठी माणसांच्या व्यवसायाची माहिती देतात. असाच एक नवीन व्हिडीओ प्रवीण तरडे यांनी शेअर केला आहे. यामध्ये ते ऑस्ट्रेलियातील मराठमोळ्या फरसाण विक्रेत्याला भेटले आहेत.
अभिनेता प्रवीण तरडे यांनी शेअर केलेला हा व्हिडीओ थेट ऑस्ट्रेलियातील आहे. यावेळी प्रवीण तरडे ऑस्ट्रेलियामध्ये एका मराठी माणसाच्या फरसाण फॅक्टरीमध्ये गेले होते. या मराठी माणसाने देशाबाहेर फक्त आणि फक्त फरसाण विकून कोट्यवधी रुपये कमावले आहेत. या मराठी माणसाचं नाव योगेश चव्हाण असे असून ते मूळचे कराडचे आहेत. योगेश यांची ऑस्ट्रेलियामध्ये फरसाण फॅक्टरी आहे. यावेळी प्रवीण तरडे त्याची पत्नी स्नेहलसोबत ऑस्ट्रेलियाला गेले होते. त्यामुळे कराडच्या योगेश चव्हाण यांच्या व्यवसायाला भेट देताना स्नेहल देखील उपस्थित होत्या. ऑस्ट्रेलिया सारख्या परक्या देशात योगेश यांनी स्वतःचं साम्राज्य उभं केलंय.
निश्चितच हि बाब थोडकी नव्हे आणि म्हणूनच प्रवीण तरडे यांनी योगेश यांच्यासोबतचा सविस्तर व्हिडिओ शेयर करत त्यांचे कौतुक केले आहे. शिवाय त्यांच्या कर्तृत्वाविषयी अभिमान व्यक्त केला आहे. या व्हिडिओसोबत कॅप्शनमध्ये प्रवीण तरडे यांनी लिहिलंय कि, ‘ॲास्ट्रेलियातील मराठीबाणा, ६५ किलो घरी बनवलेले फरसाण घेउन कराडचा योगेश चव्हाण हा मराठी तरूण ॲास्ट्रेलियात आला आणि आज ईथे वर्षाला ७० हजार किलोचा माल तो विकतोय.. आता महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातून त्याला उद्योजक तयार करायचेत.. खाली दिलेल्या लिंकवर तुम्ही त्याच्याशी संपर्क करू शकता’. या पूर्ण व्हिडिओत प्रवीण यांनी योगेश यांच्या व्यवसायाची सविस्तर माहिती पुरवली आहे. तसेच इतर उद्योजकांना प्रोत्साहित केले आहे.
Discussion about this post