हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता अशी ओळख असलेले प्रवीण तरडे सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतात. मनोरंजन विश्वात एक अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून खोलवर पाय रोवलेले तरडे एक शेतकरी म्हणून अभिमानाने जगतात. प्रवीण तरडे यांचा ‘मुळशी पॅटर्न’, ‘सरसेनापती हंबीरराव’, ‘धर्मवीर’ असे अनेक चित्रपट चांगलेच गाजले आहेत. या प्रत्येक कलाकृतीवर चाहत्यांनी विशेष प्रेम केलं आहे. इतकं असूनही गावाकडची शेती हा तरडेंसाठी जिव्हाळ्याचा विषय आहे. ते नेहमीच याबाबत काही ना काही पोस्ट शेअर करत असतात. यावेळी त्यांनी शेत नांगरतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे.
सध्या राज्यात पावसाने जोर धरला आहे. त्यामुळे ठिकठिकाणी नांगरणी, पेरणी अशा शेतीच्या कामांना वेग आलाय. यातच तरडेही गावी गेले आहेत आणि त्यांनी शेत नांगरलं आहे. तरडेंनी आपल्या हातात नांगर धरून भात शेतीत नांगरताना एक व्हिडीओ तयार केलाय आणि तो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओत ते बैलजोडी घेऊन स्वत: शेतात राबताना दिसत आहेत. ‘काळ्या मातीत मातीत तिफन चालते’ हे गाणे बॅक ग्राऊंडला ऐकायला मिळत आहे. या व्हिडिओला कॅप्शन देत तरडेंनी लिहिलंय कि, ‘हा चिखल पायाला काय अख्ख्या अंगाला लागला तरी झटकला नाही जात.. कारण आपल्या कैक पिढ्यांनी हा चिखल एखाद्या दागिन्यासारखा मिरवलाय आपणही मिरवू …’.
अभिनेता आणि दिग्दर्शक प्रवीण विठ्ठल तरडे हे आपल्या कामाव्यतिरिक्त शेती अतिशय मन लावून करतात. विशेष म्हणजे आपली संस्कृती, आपली परंपरा, आपली माणसं, आपली शेती या विषयांवर प्रवीण तरडे आवर्जून बोलताना दिसतात. याविषयी अनेकदा ते विविध व्हिडीओ किंवा पोस्ट शेअर करताना दिसतात. त्यांचं आपल्या गावावर आणि शेतीवर प्रचंड प्रेम आहे. त्यामुळे कितीही व्यस्त असले तरीही वेळ काढून ते आपल्या गावी जाऊन शेती करतात. यावेळी तरडेंनी शेअर केलेला हा व्हिडीओदेखील एक संदेश देतो आहे. यावर एका नेटकऱ्याने कमेंट करत म्हटले आहे कि, ‘सर मी ही जीवनात कीतीही मोठा जरी झालो तरी शेतीला सोडणार नाही.. आज तुमच्याकडून काहीतरी शिकायला भेटले.’
Discussion about this post