नागपूर : तब्बल सात वर्षांनंतर मराठी सिनेसृष्टीतील ‘क्युट कपल’ अर्थात प्रिया बापट आणि उमेश कामत आता ‘आणि काय हवं’ या वेबसिरीजच्या माध्यमातून पुन्हा प्रेक्षकांना बघता येणार आहे. ‘मुरांबा’ फेम वरूण नावेकर दिग्दर्शित, अनिश जोग, रणजित गुगळे निर्मित ‘आणि काय हवं’ ही सहा भागांची वेबसिरीज १६ जुलैपासून एमएक्स प्लेयरवर प्रेक्षकांना कुठलंही शुल्क न देता मोफत बघता येणार आहे. ‘आणि काय हवं’ या वेबसिरीजच्या प्रमोशनसाठी प्रिया बापट उमेश कामत, आणि वरूण नार्वेकर हे नागपुरात आले असता, त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
यावेळी प्रिया बापट आणि उमेश कामत यांनी सांगितले की, ”सात वर्षांपूर्वी आम्ही एकत्र काम केलं होतं. एक मालिका, एक व्यावसायिक नाटक आणि त्यानंतर ‘टाईम प्लीज’ हा चित्रपट. अशा विविध माध्यमांमधून प्रिया आणि मी प्रेक्षकांच्या भेटीला आलो. मात्र त्यानंतर बराच काळ आम्ही एकत्र काम केलं नाही. परंतु कालांतरानं आम्हालाही याची जाणीव झाली, की आपण एकत्र काम केलं पाहिजे. काही प्रोजेक्ट्सबाबत आम्हाला विचारणाही करण्यात आली. मात्र इतक्या वर्षांच्या कालावधीनंतर एकत्र पडद्यावर झळकण्यासाठी आम्हाला ते विषय तितकेसे भावले नाहीत. याच दरम्यान अनिश जोग आणि वरुण नार्वेकर यांनी या वेबसिरीजबद्दल आम्हाला विचारणा केली. त्यांची संकल्पना ऐकल्यानंतर, त्या क्षणी मनात आले, की इतकी वर्षं थांबल्याचा निश्चितच फायदा झाला.”
लग्नानंतर घेतलेलं पाहिलं घर, पहिली गाडी, एकत्र साजरा केलेला पहिला सण अशा लग्नानंतर एकत्र केलेल्या अनेक ‘पहिल्या’ गोष्टींचं अप्रूप काही औरच! आणि या वेबसिरीजमध्ये हेच लग्नानंतरचे छोटे छोटे सुखद क्षण दाखवण्यात आले आहेत. ही वेबसिरीज बघताना नकळत तुम्हीही तुमच्या आयुष्यातील या अमूल्य आठवणींना उजाळा द्याल. अशी अपेक्षा प्रिया बापट यांनी व्यक्त केली.
Discussion about this post