हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या अनेक वर्षांपासून ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ हि मालिका प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करीत आहे. या मालिकेतील गोकुलधाम सोसायटी आणि यातील विविध कुटुंबांच्या विविध हरकतींनी नेहमीच प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या कुटुंबाचा एक भाग झाला आहे. साधारण १५ वर्ष हि मालिका मनोरंजन विश्व गाजवत आहे आणि तरीही प्रेक्षकांची लाडकी मालिका म्हणून ओळखली जाते. अशातच आता मालिकेचे निर्माते असित मोदी यांनी मालिकेविषयी अत्यंत महत्वाची आणि मोठी माहिती दिली आहे. ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ हि मालिका आता लवकरच रुपेरी पडद्यावर येणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे.
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही केवळ मालिका नव्हे तर दैनंदिनी झाली आहे. अशातच आता ही मोठ्या पडद्यावर येणार असल्याची बातमी ऐकून चाहते प्रचंड खुश झाले आहेत. दरम्यान या मालिकेचे कार्टून व्हर्जन गतवर्षी रिलीज करण्यात आले होते. इतकेच काय तर मालिकेतील लोकप्रिय पात्र जेठालाल याला लक्षात घेऊन ‘रन जेठा रन’ हा गेमही लाँच करण्यात आला होता. या कार्टून सीरिज आणि गेमलासुद्धा प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. यानंतर आता मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी हे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा युनिव्हर्स’ तयार करणार असल्याची माहिती त्यांनी स्वतःच एका मुलाखतीत दिली आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत निर्माते असीत मोदी म्हणाले कि, ‘प्रेक्षकांनी तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेवर भरभरून प्रेम केलंय. गेल्या १५ वर्षांपासून ही मालिका केवळ टीव्हीवरच नाही तर OTT, यूट्युब आणि अन्य प्लॅटफॉर्मवरही प्रेक्षक आवडीने पाहत आहेत. त्यामुळे मला वाटत की मालिकेतील कलाकारांचा वापर अधिक चांगल्या पद्धतीनं करायला हवा. जेठालाल, बबिता, दयाबेन, सोढी आणि अन्य पात्र प्रेक्षकांच्या घरातील सदस्य झाले आहेत. त्यामुळेच मी युनिव्हर्सचा विचार केला आहे.
प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकांनी आमचा कार्यक्रम बघावा असं मला वाटतं. त्यामुळे सर्व वयोगटातील लोकांना आम्ही काही ना काही देत आहोत. गेमच्या माध्यमातून या दिशेने आम्ही पहिलं पाऊल टाकलंय’. यावेळी असित मोदी यांना TMKOC वर सिनेमा बनवण्याचा विचार आहे का..? असे विचारले असताना त्यांनी म्हटले, ‘हो नक्कीच यावर एक सिनेमा बनवण्याचा विचार आहे. ही एक अॅनिमेटेड फिल्म असेल. यात सर्व काही असेल. तारक मेहता कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्या ज्या माध्यमात जाता येईल, त्या त्या माध्यमात आम्ही नक्कीच जाऊ.’
Discussion about this post