हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक, सुपरस्टार आणि दिग्गज कलाकार यांचा सहभाग असलेल्या आणि पुनित बालन ग्रुप तर्फे आयोजित दुसर्या ‘पुनित बालन सेलिब्रीटी लीग’ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. पुण्यात ही स्पर्धा १२ ते १५ जानेवारी २०२३ या कालावधीमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियम स्वारगेट येथे होणार असून सर्व प्रेक्षकांना मोफत प्रवेश देण्यात येणार आहे.
या स्पर्धेबाबत अधिक माहिती देताना पुनित बालन ग्रुपचे कार्यकारी संचालक पुनित बालन म्हणाले की, मराठी चित्रपट सृष्टीतील एकापेक्षा एक दिग्गज आणि नामांकित दिग्दर्शक, आघाडीचे सुपरस्टार कलाकार, सहाय्यक कलाकार आणि कलादिग्दर्शक, संगीतकार, लेखक-गीतकार, तंत्रज्ञ यांचा समावेश असलेली ही स्पर्धा सलग दुसर्या वर्षी आयोजित केली जात आहे. क्रिकेट आणि चित्रपट कलाकार यांचे नाते हे अतूट आहे. हे सर्वच कलाकार चित्रपट आणि इतर माध्यमांव्दारे आत्तापर्यंत नागरिकांचे मनोरंजन करत असतात. आता क्रिकेटच्या मैदानावर उतरून ते आपले कौशल्यपणाला लावणार आहेत. क्रिकेट, कलाकार आणि धमाल-मस्ती अशी अनोखी मेजवानी या स्पर्धेव्दारे सर्वांना देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे बालन यांनी स्पष्ट केले.
ही स्पर्धा १२ ते १५ जानेवारी २०२३ या कालावधीमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियम स्वारगेट येथे होणार आहे. हे सर्व सामने दिवस-रात्री या कालावधीत होणार आहेत. स्पर्धेला पुनित बालन ग्रुप आणि माणिकचंद ऑक्सिरीच यांचे प्रायोजक्त्व लाभले आहे. स्पर्धेत एकूण ४ लाख रूपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत.
पहिल्या स्पर्धेतील विजेते शिवनेरी रॉयल्स्, उपविजेतेपद मिळवणारा पन्हाळा जॅग्वॉर्स, तोरणा लायन्स्, रायगड पँथर्स, सिंहगड स्ट्रायकर्स, प्रतापगड टायगर्स या ६ संघांमध्ये विजेतेपदाची चुरस पहावयास मिळणार आहे. पांढर्या चेंडूवर होणार्या या स्पर्धेचे सामने साखळी आणि बाद फेरीमध्ये होणार आहेत.
कर्णधार पुनित बालन असलेला तोरणा लायन्स्, महेश मांजरेकर कर्णधार असलेला पन्हाळा जॅग्वॉर्स, शरद केळकर कर्णधार असलेले प्रतापगड टायगर्स, सिध्दार्थ जाधव कर्णधार असलेला सिंहगड स्ट्रायकर्स, सुबोध भावे कर्णधार असलेला शिवनेरी रॉयल्स् आणि प्रविण तरडे कर्णधार असलेला रायगड पँथर्स असे एकापेक्षा एक दिग्गज सुपरस्टार-कलाकार स्पर्धेत या संघांचे प्रतिनिधीत्व करणार आहेत.
स्पर्धेतील विजेत्या संघाला १ लाख ११ हजार रूपये आणि करंडक तर, उपविजेत्या संघाला ५१ हजार रूपये आणि करंडक मिळणार आहे. या शिवाय स्पर्धेत वैयक्तिक पारितोषिकेही देण्यात येणार आहेत.
मालिकेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू याला २१ हजार रूपये आणि इलेक्ट्रीकल बाईक मिळणार आहे. सर्वोत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक यांना करंडक व ११,१११ रूपये (प्रत्येकी) देण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक सामन्यासाठी प्लेअर ऑफ द मॅच (सामनावीर) खेळाडूला ५ हजार रूपये आणि करंडक अशी पारितोषिकांची रेलचेल या स्पर्धेत असणार आहे.
या स्पर्धेसाठी सर्व प्रेक्षकांना आणि रसिकांना मोफत प्रवेश देण्यात येणार आहे. त्यामुळे आपल्या लाडक्या कलाकारांना क्रिडा विश्वात रमताना पहायला प्रेक्षक मोठी गर्दी करणार आहेत याबाबत काही शंका नाही.
या शिवाय प्रेक्षकांना या सर्व सामन्यांचा आनंद ‘पुनित बालन स्डुडिओज्’ या ‘यु-ट्युब चॅनेल’ माध्यमाव्दारे घेता येणार आहे, असे पुनित बालन यांनी सांगितले.
Discussion about this post