हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अवघ्या ५- ६ दिवसावर बाप्पाचं आगमन आलं आहे. त्यात तब्बल २ वर्षानंतर यंदाचा गणेशोत्सव एकदम जोरात होणार आहे. त्यामुळे सगळीकडे कशी लगबग सुरु आहे. बाप्पा येणार एव्हढंच सगळ्यांच्या डोक्यात आहे. सगळीकडे गणेशोत्सवाचे उत्साही वारे वाहत आहेत. अनेक ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव साजरे केले जातात. तर अनेकांच्या घरी बाप्पा विराजमान होतात. त्यामुळे बाप्पाची मूर्ती, सजावट, मखर, देखावे अशा पूर्व तयारीची एकदम जोरदार गडबड सुरु असेल. अनेक कलाकारांच्या घरी देखील बाप्पाचं जल्लोषात आगमन होतं. आपला बाप्पा सगळ्यांवरक्षा कसा वेगळा असेल यासाठी सगळेच धडपडत असतात. पण आपला बाप्पा पर्यावरणपूरक कसा असेल..? याकडे फार कमी लोक लक्ष देतात. यामध्ये गायक आणि अभिनेता राहुल देशपांडे यांचा समावेश आहे.
राहुल देशपांडे सध्या गणेशोत्सवाच्या तयारीत चांगलेच व्यस्त आहेत. त्यांनी अतिशय सुंदर संदेश देत ईको फ्रेंडली गणेशमूर्ती घडवली आहे. त्याच काय झालं, पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ‘रंगवा तुमचा कागदी बाप्पा’ असा इको- फ्रेंडली गणेशोत्सवासाठी भव्य असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या विशेष उपक्रमात राहुल देशपांडे आपल्या कुटुंबासह सहभागी झाले होते. यावेळी राहुल स्वतः, त्यांची पत्नी नेहा आणि चिमुकली लेक रेणुका आपल्या बाप्पाची मूर्ती रंगवताना दिसले. दरम्यानचे काही फोटो अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर शेअर करत राहुल देशपांडे यांनी पर्यावरण पूरक बाप्पाचा उत्सव साजरा करण्याचा संदेश दिलाय.
राहुल देशपांडे यांनी या फोटोंसह कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘शिवाजी नगर येथील पुणे हँडमेड पेपर्सच्या आवारात संपन्न झालेल्या उपक्रमात आज विद्यार्थ्यांसोबत कागदी बाप्पा स्वतः रंगवताना एक वेगळीच उर्जा जाणवली. या इको-फ्रेंडली गणेशमूर्ती अनोख्या असून त्या ८०% कापूस-कागदाचा लगदा आणि २०% शाडू माती अशा विशिष्ट मिश्रणापासून तयार केल्या जातात.
महत्वाचे म्हणजे यामध्ये वापरण्यात आलेला कागद हा वृक्षतोड करून तयार केलेला नसून, वापरलेल्या कागदाची गुणवत्ता सुधारुन म्हणजेच पेपर अपसायकल करून वापरला आहे. या मूर्ती वजनाने हलक्या असतात आणि जलरंगांनी रंगवता येतात अशी माहिती मला शोभना हडप आणि संजीव पवार यांनी दिली तेंव्हा आपण एका चांगल्या उपक्रमाचा भाग झालो याचा आनंद वाटला. यंदा गणेशोत्सव उत्साहात साजरा करताना आपण सगळेच पर्यावरणाचे भान ठेवूयात.’
Discussion about this post