हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कौन बनेगा करोडपती हा एक असा शो आहे, जिथे कित्येक लोक आपले करोडपती होण्याचे स्वप्न घेऊन सहभागी होतात. आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर आतापर्यंत कितीतरी लोकांनी या शोच्या माध्यमातून मोठंमोठ्या रकमेची बक्षिसं मिळवली आहेत. पण नुकतीच एक अशी बातमी समोर येत आहे कि या शोमध्ये सहभागी झाल्यामुळे एका रेल्वे कर्मचाऱ्याला चांगलाच आर्थिक फटका बसला आहे. त्याचे झाले असे कि, कोटा विभागातील कार्यालय अधीक्षक देशबंधू पांडे यांच्यावर रेल्वे प्रशासनानं मोठी कारवाई केली आहे.यामुळे त्यांना आर्थिक फटका बसला आहेच शिवाय त्यांचे संपूर्ण कुटुंब तणावाखाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार त्यांना चार्जशीट पाठवण्यात आली आहे. याशिवाय ३ वर्षांसाठी त्यांची पगारवाढ थांबवण्यात आली आहे. रेल्वे प्रशासनाने केलेल्या या कारवाईला कर्मचारी संघटनेने विरोध केला आहे. कारण, पांडेंच्याविरुद्ध झालेली कारवाई अयोग्य असल्याचे पश्चिम मध्य रेल्वे मजूर संघाचे सचिव अब्दुल खालिद यांनी म्हटलं आहे. मजूर संघ पांडे यांच्यावर झालेल्या अन्यायाविरोधात लढा देईल, असंही खालिद यांनी माध्यमांना सांगितले आहे.
KBCमध्ये सहभागी होण्यासाठी देशबंधू पांडे यांनी ९ ते १३ ऑगस्ट असा सुट्टीचा अर्ज अधिकाऱ्यांना दिला होता. मात्र त्यांच्या अर्जावर कोणताही विचार करण्यात आला नाही. उलट त्यांना सुट्टी मंजूरच झाली नाही. परंतु सुट्टी नसताना पांडे KBC च्या शूटसाठी मुंबईला गेले आणि ३ लाख २० हजार रुपयेसुद्धा जिंकले. मात्र ही रक्कम पांडे यांना चांगलीच महागात पडली. कारण आनंदी होऊन घरी परतलेल्या पांडे यांना १८ ऑगस्टला रेल्वेकडून थेट चार्जशीट पाठवण्यात आली. ज्यात त्यांची पगारवाढ ३ वर्षांसाठी थांबवण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. रेल्वेनं केलेल्या कारवाईमुळे पांडे आणि त्यांचं कुटुंब अक्षरशः तणावाखाली आहे. कारण पगारवाढ रोखल्यामूळे पांडे यांना दीड लाख रुपयांवर पाणी सोडावं लागणार आहे. त्यात जिंकलेल्या बक्षिसाच्या रकमेतूनही कर कापला जाईल.
Discussion about this post