हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ओम राऊतच्या ‘आदिपुरुष’ या सिनेमाबाबत गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर तुफान चर्चा आहे. हा सिनेमा कधी एकदा रिलीज होतोय असे प्रत्येकाला वाटत आहे. अशातच सिनेमाच्या ट्रेलरने आणि गाण्यांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. ज्यामुळे सिनेमाबाबतची उत्सुकता आणखीच वाढली आहे. आदिपुरुष या सिनेमातील ‘जय श्री राम’ या एनर्जेटिक गाण्यानंतर आता ‘राम सिया राम’ हे भावनिक गाणे प्रदर्शित झाले आहे. या गाण्यात सीतेच्या विरहाने व्याकुळ झालेले प्रभू श्रीराम अत्यंत जवळून पाहता येत आहेत.
प्रेमातील विरह हि बाब अतिशय हृदयद्रावक असते अन प्रभू श्रीराम व सीता मातेच्या विरहाची गोष्ट आपण सारेच जाणतो. एकीकडे वनवास आणि दुसरीकडे विरह. अतिशय विचित्र कसोटीतून देवाचीही सुटका झाली नाहीच. याचे कथन करणारे ‘राम सिया राम’ हे गाणे ऐकताच उर भरून येतो, डोळे ओले होतात आणि हृदयातून भावनिक स्पंदने जाणवतात. ‘आदिपुरुष’मधील ‘राम सिया राम’ या नव्या गाण्यातून प्रेम अन विरह या भावनांची उत्कटता व्यक्त केली आहे.
या संपूर्ण गाण्यामध्ये प्रभू श्रीराम आणि सीतेचा आनंदी सहवास ते विरहातील व्याकुळता असे अनेक प्रेम तसेच भावनिक प्रसंग पाहता येत आहेत. या गाण्यात एका प्रसंगात सीतेला ओळख पटावी म्हणून श्रीरामांनी हनुमंताला दिलेली अंगठी दिसते आहे. या गाण्याने प्रभू श्रीराम आणि सीता माता यांच्यातील नाजूक बंध अत्यंत भावनिक पद्धतीने मांडले आहे. ‘आदिपुरुष’ या सिनेमात अभिनेता प्रभास हा प्रभू श्रीरामांच्या भूमिकेत तर अभिनेत्री क्रिती सॅनॉन हि सीता मातेच्या भूमिकेत दिसते आहे. या सिनेमाच्या माध्यमातून रामायण एका अनोख्या आणि नव्या पद्धतीने मोठ्या पडद्यावर पहायला मिळणार आहे.
Discussion about this post