हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। असं म्हणतात, लांब गेल्यावरच जवळच आठवतं ! आणि हे अगदी बरोबर आहे. घरापासून दूर गेल्यावरच आपल्याला घराची, घरच्यांची किंमत कळते. घरापासून दूर असलेल्या प्रत्येकाच्या मनातील तळमळ असलेले ‘सनी’ चित्रपटातील ‘रात ही’ हे गाणं दिवाळीच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. कामानिमित्ताने, शिक्षणानिमित्ताने आपल्या कुटुंबापासून, मित्रमैत्रिणींपासून लांब असणाऱ्या प्रत्येकासाठी हे गाणं आहे. क्षितिज पटवर्धन यांचे भावस्पर्शी बोल असणाऱ्या या गाण्याला सौमील – सिद्धार्थ यांनी संगीतबद्ध केले आहे. तर या गाण्याला निखिल डिसुझा याचा आवाज लाभला आहे. इरावती कर्णिक लिखित ‘सनी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन हेमंत ढोमे यांनी केले आहे.
घरापासून लांब गेलेल्या ललित प्रभाकराला म्हणजेच ‘सनी’ला क्षणोक्षणी घरच्यांची, त्याच्या मित्रांची आठवण येत आहे. ज्या गोष्टी घरी असताना त्याला क्षुल्लक वाटत होत्या, त्याचे महत्व त्याला घरापासून लांब गेल्यावर उलगडत आहे. ‘होमसिक’ बनलेल्या ‘सनी’चा एक भावनिक प्रवास यात दिसत आहे. क्रेझी फ्यु फिल्म्स, प्लॅनेट मराठी, क्रिएटिव्ह वाईब प्रॉडक्शन प्रस्तुत, चलचित्र कंपनी निर्मित ‘सनी’ हा सिनेमा १८ नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. अक्षय विलास बर्दापूरकर, क्षिती जोग, विराज गवस व उर्फी काझमी हे सिनेमाचे निर्माते असून संतोष खेर, तेजस्विनी पंडित सह-निर्माते आहेत.
या गाण्याबद्दल दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतात, ” या गाण्यात आणि माझ्या आयुष्यात खूप साम्य आहे. घरी असताना अशा अनेक छोट्या-छोट्या गोष्टी असतात, ज्या आपल्यासाठी नगण्य असतात. परंतु घरापासून दूर गेल्यावर त्याच गोष्टींचे आपल्या आयुष्यात किती खास महत्व आहे ते कळते. विशेषतः सणासुदीच्या दिवसांत आपले घर, कुटुंब, नातेवाईक, मित्रपरिवार यांची आठवण खूप येते. घरापासून दूर राहणाऱ्या प्रत्येकाची कहाणी म्हणजे ‘सनी’. हे मनाला भिडणारे गाणे तुम्हाला नक्की आवडेल.”
Discussion about this post