हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। काल २३ मे २०२३ रोजी मुंबईत मराठी चित्रपट ‘रावरंभा’चा ग्रँड प्रीमिअर सोहळा रंगला. या प्रिमिअरसाठी अनेक दिग्गज कलाकार मंडळी, चित्रपटाची टीम उपस्थित होते. युगप्रवर्तक शिवछत्रपतींच्या भारलेल्या काळाची पार्श्वभूमी असलेल्या आणि शौर्य, पराक्रमात भिजलेल्या एका झुंजार मावळ्याची अनोखी प्रेमकहाणी ‘रावरंभा’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. हा चित्रपट येत्या २६ मे २०२३ रोजी प्रदर्शित होत आहे. पण तत्पूर्वी या चित्रपटाच्या टीमने किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी स्थळाला भेट दिली आणि छत्रपतींचा आशीर्वाद घेतला आहे.
यावेळी ‘रावरंभा’ चित्रपटाची संपूर्ण टिम उपस्थित होती. चित्रपटातील प्रमुख कलाकार अभिनेता ओम भुतकर आणि अभिनेत्री मोनालिसा बागल याठिकाणी उपस्थित होते आणि सर्वांनी मिळून शिवाजी महाराजांना मनोभावे अभिवादन केले. इतकेच नव्हे तर चित्रपटाच्या टीमने महाराजांच्या समाधी स्थळासमोर पोस्टर लाँच केलं.
छत्रपतींचा इतिहास इतका जाज्वल्य आहे कि तो पुढील पिढीसमोर मांडताना फार बारकाईने काम करावे लागते. अशातच जेव्हा गोष्ट रणभूमीवर समशेर फिरवून शत्रूंना नामोहरम करणाऱ्या योद्धांची असते तेव्हा हि केवळ एक कथा नसते तर हि एक यशोगाथा असते. मात्र ‘रावरंभा’ हि केवळ यशोगाथा नसून सह्याद्रीच्या कडेकपारीत लुप्त झालेली एक प्रेमकथासुद्धा आहे.
स्वराज्यासाठी तलवारीशी लगीन लागलेला ‘राव’ अन त्या तलवारीची खडी ढाल ‘रंभा’ यांची हि रांगडी प्रेमकहाणी उलघडण्यासाठी ‘रावरंभा’ हा चित्रपट सज्ज झाला आहे. या चित्रपटातील गाणी गुरु ठाकूर आणि क्षितिज पटवर्धन यांनी लिहिली आहेत. तर आदर्श शिंदे, आनंदी जोशी, हर्षवर्धन वावरे, रवींद्र खोमणे या गायकांनी हि गाणी गायली आहेत. संगीतकार अमितराज यांनी गाण्यांना संगीत दिले आहे.
तसेच ‘रावरंभा’ चित्रपटाची पटकथा आणि संवाद प्रताप गंगावणे यांचे आहेत. तर छायांकन संजय जाधव आणि संकलन फैजल महाडिक यांचे आहे. या आधी हा चित्रपट १२ मे २०२३ रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र तांत्रिक अडचणींमुळे प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. ज्यामुळे येत्या २६ मे २०२३ रोजी ‘रावरंभा’ थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
Discussion about this post