हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रेम हे सांगता येत नाही, बोलता येत नाही, दाखवताही येत नाही..तो केवळ दोन मनांचा अनुभव आहे असं प्रेमाविषयी संत तुकाराम यांनी लिहून ठेवलं आहे. प्रेमाच्या शेकडो व्याख्या लोकांनी करून ठेवल्या, त्यावर हजारो चित्रपट, पुस्तकं निघाली. तरीही तुमचं आमचं प्रेम सेम नसतं ही गोष्ट आपल्यापैकी प्रत्येकाला कळून चुकलेली आहे. वेगवेगळ्या नात्यांत वेगवेगळ्या प्रेमाची अनुभूती घेणाऱ्या लोकांचं जगणं आपण रोज अनुभवत असतो. एखादी व्यक्ती आपल्या प्रेमाचा स्वीकार करत नाही तेव्हा काय होतं? एखादी प्रेम करणारी व्यक्ती अचानक सोडून जाते तेव्हा मनाची काय घालमेल होते? त्यातून सावरनं किती कठीण असतं या अनुभवांतूनही आपण जातच असतो. खरं प्रेम एकदाच होतं का? प्रेमाची विशिष्ट चौकट असते का? प्रेमात नैतिक-अनैतिक असं काही असतं का? एखाद्या व्यक्तीला न विसरता दुसऱ्यावर प्रेम करता येतं का? हे प्रश्नसुद्धा आपल्याला कधी ना कधी कोड्यात टाकत असतात. Love again हा चित्रपट अशाच काही प्रश्नांची उत्तरं द्यायला आपल्याला मदत करतो.
प्रियांका चोप्रा-जोनास या भारतीय अभिनेत्रीची प्रमुख भूमिका असलेला love again हा हॉलिवूड चित्रपट आहे. आपल्या टॅलेंटने जागतिक चित्रपटसृष्टीत जम बसवलेली प्रियांका ही हरहुन्नरी अभिनेत्री आहे. प्रियांकाशिवाय या चित्रपटात सॅम ह्युगन आणि सेलिन डिओन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. जॉन (एरिन्झ केन) आणि मीरा (प्रियांका चोप्रा) हे दोघे एकमेकांचे प्रियकर-प्रेयसी. एका रेस्टॉरंटमधील भेटीनंतर दोघेही लग्न करणार असतात, मात्र त्याच वेळी जॉनचा एका अपघातात मृत्यू होतो. या मृत्यूनंतर थेट २ वर्षानंतरची मीरा चित्रपटात दाखवली आहे. जॉनच्या आठवणीत रमलेल्या मिराने तोपर्यंत कुणाशीही लग्नाचा विचार केलेला नसतो. दरम्यानच्या काळात लहान मुलांसाठीची चित्रमय गोष्टींची पुस्तकं लिहिणारी लेखिका ही ओळख तिने मिळवलेली असते. स्वतःच्या लहान बहिणीसोबत ती तिचं आयुष्य जगत असते. एके दिवशी तिला जॉनच्या वस्तूंची एक पेटी मिळते. त्याचा शर्ट, त्यांच्या आवडीच्या ऑपेरा संगीताच्या कॅसेट्स आणि इतर वस्तू त्यामध्ये असतात. या वस्तू मिळाल्यानंतर मीरा काहीशी हरखून जाते. मात्र हे तेवढ्यापुरतंच.
या कथेतलं दुसरं मुख्य पात्र आहे रॉब बर्न्सचं (सॅम ह्युगन). रॉब एका माध्यमसंस्थेत पत्रकार आहे. स्वतःचं ठरलेलं लग्न आठवडाभर आधी मोडल्यानंतर रॉब व्यथित झालेला असतो. प्रेयसीने नकार द्यायचं नेमकं कारणही त्याला समजलेलं नसतं. मीरा आणि रॉबच्या आयुष्यातील हा सुरुवातीचा टप्पा. एके दिवशी मिराला जॉनची आठवण आल्यानंतर ती त्याच्या मोबाईल नंबरवर मेसेज करायला सुरुवात करते. आपल्याकडे साधारण मृत व्यक्तींचा नंबर कुणीतरी दुसरं वापरायला घेतं किंवा त्यावर फोन लावणं लोकांकडून आपोआपच बंद होतं. मिराच्या बाबतीत काय होतं हे तुम्हाला चित्रपटात समजेलच. तर मीरा जॉनच्या नंबरवर मेसेज करत राहते. स्वतःच्या भावना व्यक्त करत राहते. काही दिवसांनी बहिणीच्या आग्रहास्तव ती दुसऱ्या मुलाला भेटते. मात्र त्याच्याविषयीसुद्धा मिराला विशेष काही वाटत नाही. ही गोष्टसुद्धा ती जॉनच्या नंबरला मेसेज करून कळवत राहते.
दुसरीकडे रॉबसुद्धा त्याच्या कामात लक्ष घालण्याचा प्रयत्न करत असतो. दरम्यान त्याला सेलिना डिओन या प्रसिद्ध गायिकेची पत्रकार परिषद आणि मुलाखत घेण्याची संधी मिळते. टायटॅनिक चित्रपटातील My heart will go on गाणं म्हटलेली ही गायिका बरं का..! तिच्यासोबतच्या भेटींमध्ये प्रेम म्हणजे काय हे समजून घेण्याचा प्रयत्न रॉब करत असतो. मिराच्या मेसेजेसचं पुढं काय होतं? ती जॉनला विसरते का? रॉबच्या कामाचं पुढं काय होतं? त्याचा आणि मिराचा काही संबंध असतो का?
सेलिना डिओन या गायिकेची चित्रपटातील भूमिका नेमकी काय आहे? हे सर्व अनुभवण्यासाठी तुम्हाला हा चित्रपट पहावा लागेल. पावणेदोन तासांचा हा हलकाफुलका चित्रपट तुम्हाला प्रेमाचं एक नवीन रुपडं दाखवून जाईल. कायम हव्या-हव्याशा वाटणाऱ्या व्यक्तीला न विसरता प्रेम करता येतं का? याचं उत्तर तुम्हाला चित्रपटात शेवटी मिळेलच. बाकी आठवडाभरात हा चित्रपट थिएटरमधून जाण्याआधी आपल्या लाडक्या व्यक्तीसोबत बघून घ्या, इतकंच..!
Discussion about this post