हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दुर्गम भागातील सामान्य माणसाचं जगणं उलगडून दाखवणारे अनेक चित्रपट आपण पाहिले. या चित्रपटांमध्ये समाजाचं पिचलेपण, व्यवस्थेकडून त्यांच्यावर होणारा अन्याय आणि त्या अन्यायातून त्यांना वाचवणारा नायक असं साधारण चित्र आपल्यासमोर मांडलं गेलं. मात्र या व्यवस्थेतील प्रामाणिक, संवेदनशील लोकं ज्यावेळी चांगली आणि वाईट बाजू समजून घेऊन काम करतात तेव्हा त्याचे परिणाम काय होतात याची ग्रे शेड (झलक) दाखवणारा चित्रपट म्हणजे ‘घर बंदूक बिरयानी’.
हेमंत अवताडे यांचं दिग्दर्शन असलेला ‘घर बंदूक बिरयानी’ हा बहुचर्चित मराठी चित्रपट आज प्रदर्शित झाला. नागराज मंजुळे, सयाजी शिंदे, आकाश ठोसर, सायली पाटील, विठ्ठल काळे यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट वेगळ्या धाटणीचा असून नागराज मंजुळे यांच्या चित्रपटात जाणवणारा ट्रेडमार्क सस्पेन्स या चित्रपटात आहे. कोलागुडा गावात सुरू होणारी ही कथा पोलीस आणि राजकीय यंत्रणेविरुद्ध शस्त्र हातात घेतलेल्या लोकांभोवती फिरत राहते. प्रचलित व्यवस्थेत या लोकांना आपण नक्षली म्हणतो. चित्रपटात मात्र असा उल्लेख कुठेही नाही. या शस्त्र हातात घेतलेल्या टोळीतील काही लोकांना एका चकमकीत पोलिस जीवानिशी मारतात. यात टोळीप्रमुखाच्या (सयाजी शिंदे – पल्लम) प्रेयसीचा (मारिया) समावेश असतो. याचा बदला म्हणून पोलीसांच्या तुकडीचं नेतृत्व करणाऱ्या प्रमुखाला या टोळीकडून मारलं जातं. या गावात काम करणं म्हणजे पोलिसांना मिळालेली शिक्षाच जणू.
राजू आचारी (आकाश ठोसर) या सामान्य पण प्रामाणिक मुलाचं ‘घर’ नसल्यामुळे रखडत चाललेलं लग्न, त्याला ‘बिरयानी’ बनवण्याची असलेली आवड आणि लग्नासाठी घराचं स्वप्न पूर्ण करण्याचा आटापिटा म्हणून त्याला हातात ‘बंदूक’ घ्यावी लागण्याचा प्रवास या गोष्टी चित्रपटाच्या टायटलला पूरक पद्धतीने घेतल्या आहेत. याच कथानकात पुणे शहरात डॅशिंग पोलीस अधिकारी म्हणून राया पाटील (नागराज मंजुळे) यांनी नाव कमावलेलं असतं.
राजकारणी बापाच्या जोरावर ऐश करणाऱ्या आणि मस्तीत जगणाऱ्या दोन पोरांना आणि त्यांच्या साथीदारांना चोप देऊन राया पाटीलने चित्रपटात भन्नाट एन्ट्री केली आहे. या कामगिरीचं बक्षीस म्हणून राया पाटील यांची बदली कोलागुडा येथे करण्यात येते. आपल्याकडे कर्तव्यदक्ष आणि राजकारण्यांना जड होणारे पोलीस अधिकारी जसे गडचिरोली किंवा इतर दुर्गम भागात पाठवले जातात तसाच हा प्रकार. राया पाटील यांच्या बायकोला घर-गृहस्थी प्रिय असल्यानं ती अर्थातच या प्रस्तावाला नकार देते. मात्र वर्दीशी इमान असलेले राया पाटील कोलागुडाला जायला राजी होतात.
व्यवस्थेविरुद्ध शस्त्राच्या मार्गाने लढू नका, आत्मसमर्पण करा असं सांगणाऱ्या कोलागुडा येथील पोलीस यंत्रणेवर टोळीतील लोकांचा विश्वास नसतो. राजकारणी लोकांनी स्वतःच्या फायद्यासाठी या लोकांचा वापर करून घेऊन यांची घरं उध्वस्त केल्याची वास्तव परिस्थिती कुणी लक्षातच घेत नसतो. अशा परिस्थितीत राया पाटील तिथे गेल्यानंतर नेमकं काय होतं? ही शस्त्र हातात घेतलेली लोकं पुढे काय करतात?पोलिसांनी नेहमी राजकारण्यांच्या ताटाखालचं मांजर रहावं का? या व्यवस्थेत सुधारणा नेमक्या कुणामध्ये व्हायला हव्यात? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी तुम्हाला ‘घर बंदूक बिरयानी’ हा चित्रपट पहावाच लागेल.
ए.व्ही.प्रफुल्लचंद्र यांचं जबरदस्त संगीत चित्रपटाला लाभलं आहे. चित्रपटातील सगळीच गाणी वेगळ्या ढंगाची आहेत. नागराज मंजुळे यांचा चित्रपट आणि हलगी हे वेगळंच समीकरण आता तयार झालंय. या चित्रपटात ते आणखी खुलून आलंय. मोहित चौहान यांनी गायलेलं घर, बंदूक, बिर्याणी हे गाणं, याशिवाय गुण गुण आणि हान की बडीव ही गाणीसुद्धा खास झाली आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा येथील घनदाट जंगलात घेतली गेलेली दृश्य ही डोळ्यांना सुखावणारी आहेत. अभिनयाच्या बाबतीत सांगायचं झाल्यास नागराज मंजुळे, सयाजी शिंदे, आकाश ठोसर यांनी अपेक्षेप्रमाणे दमदार कामगिरी केली आहे. सहकलाकारांनीही आपल्या भूमिकेत जीव ओतला आहे. बॉलिवूड चित्रपटासारखी ऍक्शन दाखवून नागराज मंजुळे यांना हवा देण्याचा प्रयत्न केला असला तरी त्यांच्या एकूण भूमिकेमध्ये ते चालून जातं.
नको त्या ठिकाणी शरणागती पत्करून आहे ती चाल सुरू ठेवण्यापेक्षा थोडं खमकं वागून चाल बिघडवली तरी चालतंय हाच संदेश या चित्रपटातून हेमंत अवताडे आणि नागराज मंजुळे यांनी दिलाय. या चित्रपटाचा पुढचा भागही येणार आहे हे रसिक प्रेक्षकांना आवर्जून सांगणं..! बाकी तुम्ही पण जाताय ना थिएटरला, चाल बिघडवायला..? नक्की जा..!
Discussion about this post