हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या २१ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला गुरुवार दिनांक २ फेब्रुवारी २०२३ पासून सुरुवात झाली आहे. ‘सेलिब्रेटिंग ७५ इयर्स ऑफ इंडिपेंडन्स विथ सिनेमा’ ही या वर्षीच्या महोत्सवाची संकल्पना असून मुकुंदनगर येथील सकल ललित कलाघर या ठिकाणी संपन्न झालेल्या कार्यक्रमात या महोत्सवाचे औपचारिक उद्घाटन झाले. यावेळी यावर्षीचा ‘एस. डी. बर्मन इंटरनॅशनल अवॉर्ड फॉर क्रिएटिव्ह म्युझिक अॅण्ड साउंड’ हा प्रसिद्ध गायिका उषा मंगेशकर यांना प्रदान करण्यात आला.
यावेळी पुणे फिल्म फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल, राज्याचे नोंदणी महानिरीक्षक आणि मुद्रांक नियंत्रक श्रावण हार्डीकर, पुणे फिल्म फाउंडेशनचे विश्वस्त डॉ मोहन आगाशे, उषा मंगेशकर, कृष्णा आदिनाथ मंगेशकर आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ अविनाश ढाकणे आदी मान्यवर उपस्थित होते.
गायिका उषा मंगेशकर यांना भारतीय चित्रपट संगीतातील उल्लेखनीय योगदानासाठी ‘एस. डी. बर्मन इंटरनॅशनल अवॉर्ड फॉर क्रिएटिव्ह म्युझिक अॅण्ड साउंड’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. यावेळी मंगेशकर यांनी डॉ. पटेल यांच्यासोबत काम केलेल्या ‘जैत रे जैत’ चित्रपटाबाबतच्या काही आठवणींना उजाळा दिला. तसेच या पुरस्काराबाबत आभार मानले. तर अभिनेते मनोजकुमार यांना राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते त्यांच्या मुंबई येथील निवासस्थानी पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी त्यांनी आभार मानलेली ध्वनीचित्रफित देखील दाखविण्यात आली.
Discussion about this post