हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। महाराष्ट्राच्या सामाजिक राजकीय वातावरणात बैलगाडा शर्यतींचे मोठे महत्व आहे. आता याच बैलगाडा शर्यतींचा जल्लोष रुपेरी पडद्यावर अवतरणार आहे. राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त दिग्दर्शक मकरंद माने यांच्या ‘खिल्लार’ या आगामी चित्रपटात बैलगाडा शर्यत आणि त्याभोवतीचे वातावरण दाखवले जाणार आहे. या चित्रपटातून मराठी अभिनेत्री रिंकू राजगुरू आणि अभिनेता ललित प्रभाकर यांची फ्रेश जोडी मुख्य भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमाचे पोस्टर रिलीज झाले असून रिंकू राजगुरूने ललितसोबतचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. जे प्रचंड व्हायरल होत आहेत.
‘खिल्लार’ सिनेमाचे पोस्टर शेअर करत रिंकूने कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘महाराष्ट्र दिनाच्या सगळ्यांना “खिल्लार” शुभेच्छा!! भिर्रर्रर्र… महाराष्ट्राच्या मातीतला अस्सल रांगडा खेळ… बैलगाडा शर्यत यावर लेखक- दिग्दर्शक मकरंद शशिमधु माने यांनी खिल्लार या मराठी चित्रपटाची घोषणा केली आहे. या सिनेमाचा आम्ही भाग आहोत याचा आम्हाला आनंद आहे’. न्युक्लिअर अॅरो पिक्चर्स या निर्मिती संस्थेतर्फे ‘खिल्लार’ या चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे. नगरसेवक संतोष भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त तळेगाव मावळ येथे झालेल्या पुणे जिल्हा केसरी भव्य २०-२० बैलगाडा शर्यतीवेळी ‘खिल्लार’ चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. येत्या काही दिवसांत चित्रपटाचं चित्रीकरण सुरू होणार आहे.
चित्रपटाचे दिग्दर्शक मकरंद माने हे मूळ पश्चिम महाराष्ट्रातील असल्यामुळे बैलगाडा शर्यतींचं वातावरण त्यांनी अतिशय जवळून पाहिलं आहे. त्यामुळेच आता हा विषय ‘खिल्लार’ चित्रपटातून ते मांडत आहेत.
रिंकू राजगुरूने मकरंद मानेंसोबत ‘कागर’ या चित्रपटात प्रमुख भूमिका केली होती. त्यामुळे मकरंद आणि रिंकू ‘खिल्लार’च्या माध्यमातून परत एकदा एकत्र काम करत आहेत. तर ललित प्रभाकरसोबत रिंकू राजगुरू पहिल्यांदाच एकत्र रुपेरी पडद्यावर झळकणार आहे आणि त्यामुळे हि जोडी पहायला प्रेक्षक उत्सुक आहेत.
Discussion about this post