हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा सुपुत्र आहे हे आपण सारेच जाणतो. विलासरावांच्या निधनानंतर आज बरीच वर्षे लोटली असली तरीही त्यांच्या आठवणी विसरता येणे शक्य नाही. दर्म्य नरितेश नेहमीच आपल्या वडिलांच्या स्मृतींना उजाळा देताना दिसतो. अनेकदा सोशल मीडियावर तो त्यांच्या आठवणी शेअर करताना दिसतो. नुकताच रितेशने त्याच्या वडिलांच्या एका मुलाखतीचा फार जुना पण तत्त्वनिष्ठ व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर चांगलाच गाजतोय. कारण राज्यात सध्या विविध राजकीय घडामोडींना वेग आला आहे आणि याच पार्श्वभूमीवर रितेशचा हा व्हिडीओ व्हायरल होतोय.
कालच्या अख्ख्या दिवसभरात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या आक्रमक व आक्षेपार्ह वक्तव्यामुळे संपूर्ण राज्यातले वातावरण बघता बघता चांगलेच ढवळून निघाले. यामुळे संपूर्ण दिवसभर राज्यात विविध जिल्ह्यातून अनेक विविध प्रतिक्रिया आणि पडसाद पाहायला मिळाले. इतका हाय होल्टेज ड्रामा राज्याच्या पातळीवर रंगला कि अजून न जाणे किती दिवस हे प्रकरण असेच गाजत राहील. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरें यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी नारायण राणे यांना काल पोलिसांनी ताब्यातही घेतले होते आणि अगदी काहीच तासांत ते जामिनावर सुटले. अशावेळी हे प्रकरण राजकीय वर्तुळाचे समीकरण बदलणारे ठरले आणि नेमके याचवेळी रितेशने विलासरावांचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ते आपल्या आक्रमक स्वभावाबद्दल बोलताना दिसत आहेत.
रितेश देशमुखने शेअर केलेल्या या व्हिडीओत विलासराव म्हणाले होते कि, ‘ माझे सर्वांशी प्रेमाचे संबध आहेत. माझ्यावर टीका करणाऱ्यासोबतही मी प्रेमानेच वागत असतो, बोलत असतो. मी लगेच व्यक्त होणारा नाही, मी कृतीतून व्यक्त होतो. मी रिअॅक्ट व्हावं, अशी अनेकदा लोकांची अपेक्षा असते. परंतु प्रत्येकाची कामाची स्टाईल वेगळी असते. काही लोक अधिक आक्रमक असतात. अनेकांना असे लोक बरे वाटतात. पण त्याच्यावर माझा फारसा विश्वास नाहीये. कारण मी ज्या संस्कृतीतून वाढलोय त्यात असे काहीच नाही. त्यामुळे आपण शांतपणे आणि संयमाने राज्यकारभार करून लोकांशी वागलं पाहिजे, असा माझा स्वभाव आहे. परिणामी माझ्याबद्दलची लोकांची मतं वेगळी असू शकतात. पण माझी ट्रीटमेंट ही लाँग टर्म आहे, शॉर्ट टर्म नाही. ती अॅलोपॅथीसारखी नाही, तर आयुर्वेदासारखी आहे.’ हा व्हिडीओ सध्या संपूर्ण राज्यात चांगलाच व्हायरल होतोय. हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर फक्त ५ तासांत सुमारे अडीच लाख लोकांनी पहिला असून अनेकांनी यावर प्रतिक्रियाही दिल्या आहेत.
Discussion about this post