हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडचा दबंग भाईजान अर्थात अभिनेता सलमान खान याचा आज ५७’वा वाढदिवस आहे. काल रात्री सलमानची बहीण अर्पिता आणि तिचा पती आयुष शर्मा यांनी त्यांच्या घरटी सलमानसाठी एक खास बर्थडे पार्टी आयोजित केली होती. या पार्टीसाठी अनेक दिग्गज सेलिब्रिटी उपस्थित होते. सोनाक्षी सिन्हा, संगीत बिजलानी, तब्बू, पूजा हेगडे आणि शाहरुख खान अशा अनेक सेलिब्रिटींनी या पार्टीत हजेरी लावली होती. सोशल मीडियावर आज सलमानचे चाहते, शुभचिंतक आणि इंडस्ट्रीतील मित्र मंडळी शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. यामध्ये अभिनेता रितेश देशमुखची पोस्ट सर्वाधिक चर्चेत आहे.
अभिनेता रितेश देशमुख हा सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतो. त्यामुळॆ त्याने सोशल मीडियालाच माध्यम बनवीत भाईजानला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. रितेशने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर सलमानसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. सोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘तुम्हाला न विचारता तुमच्यासाठी कायम उभा राहणारा, मदत करणारा असा माणूस तुमच्या आयुष्यात असेल तर तुम्ही धन्य झालात. सलमान भाऊ ही ती व्यक्ती आहे जी माझ्या आयुष्यात आहे. माझं तुझ्यावर किती प्रेम आहे हे सांगायला माझ्याकडे शब्द नाहीत… तुला उत्तम आरोग्य आणि भरपूर आयुष्य मिळो, वाढदिवसाच्या शुभेच्छा भाऊ…. खूप खूप शुभेच्या !!!’
सध्या सोशल मीडियावर रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जिनिलीया देशमुख यांचा आगामी चित्रपट ‘वेड’ प्रचंड चर्चेत आहे. येत्या ३० डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. मुख्य म्हणजे या चित्रपटात रितेशच्या सलमान भाऊची एक झलक बघायला मिळणार आहे. रितेश आणि सलमान या चित्रपटात ‘वेड लावलंय’ गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. हे गाणे सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. याआधी ‘लई भारी’ या मराठी चित्रपटात सलमान खानने रितेशसोबत एक छोटासा सीन केला होता. यानंतर आता रितेश देशमुख दिग्दर्शित ‘वेड’ चित्रपटातूनदेखील तो प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.
Discussion about this post