हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर अभिनेता रितेश देशमुख दिग्दर्शित ‘वेड’ हा चित्रपट प्रचंड चर्चेत आहे. येत्या ३० डिसेंबर २०२२ रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. याआधी चित्रपटातील लहान मोठी झलक हि प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. अलीकडेच रितेशने या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित केला होता. यानंतर मंगळवारी २९ नोव्हेंबर रोजी चित्रपटातील पहिले रोमँटिक गाणे रिलीज झाले आहे. जे पाहून नेटकरी हा चित्रपट तेलगू चित्रपटाचा रिमेक आहे असे बोलताना दिसत आहेत.
दिनांक ५ एप्रिल २०१९ रोजी साऊथ स्टार नागा चैतन्य आणि लोकप्रिय अभिनेत्री समंथा रूथ प्रभू यांचा ‘मजिली’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट एक तेलगू रोमँटिक ड्रामा आहे.
ज्याचं हिंदी डब व्हर्जनदेखील युट्युबवर प्रसिद्ध झाले आहे. अनेक प्रेक्षकांनी हा चित्रपट पाहिला आहे. त्यामुळे जेव्हा ‘वेड’ या चित्रपटाची पहिली झलक समोर आली तेव्हा अनेकांनी क्षणाचाही विलंब न करता हा चित्रपट रिमेक असल्याचे म्हटले आहे.
यानंतर नुकतेच प्रदर्शित झालेले गाणे पाहून तर नेटकऱ्यांनी हा चित्रपट १००% ‘मजिली’ चित्रपटाचा रिमेक आहे हे स्पष्ट केले आहे. सोशल मीडियावर रितेशच्या दिग्दर्शन क्षेत्रातील पदार्पणावर कौतुक व्यक्त केले जात आहे. तसेच जिनिलियाचे मराठी सिनेसृष्टीत स्वागत केले जात आहे. तरीही कुठेतरी तेलगू चित्रपटाचा रिमेक हि बाब प्रेक्षक वर्गाला खटकते आहे.
आता राहिला प्रश्न चित्रपट हिट होणार कि फ्लॉप..? तर या चित्रपटाचे डायलॉग आणि संगीत या चित्रपटाची उजवी वाजू ठरणार आहेत. चित्रपट गाजला नाही तरीही चित्रपटातील अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेली आणि गायलेली गाणी नक्कीच हिट होणार यात काही शंका नाही. मात्र रिमेकबाबत असणारी प्रेक्षकांची नाराजी हा चित्रपट कशी दूर करणार..? हा मात्र एक मोठा प्रश्नचं आहे.
सगळी बिस्त आता रितेश जिनिलियाच्या अभिनयावर आहे. कारण तेलगू चित्रपटात कधीही विसरणार नाही अशी पात्र नागा आणि समंथाने आधीच उभी केली आहेत. खास करून समंथाने साकारलेलं पात्र प्रचंड गाजल्यानंतर आता जिनिलियावर मोठी जबाबदारी आहे असे म्हणायला हरकत नाही.
Discussion about this post