हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। केदार शिंदे यांच्या ‘महाराष्ट्र शाहीर’ या आगामी मराठी चित्रपटाची गेली वर्षभर बरीच चर्चा रंगली आहे. आता या चित्रपटाचे प्रदर्शन अगदी महिन्याभरावर येऊन ठेपले आहे. हा चित्रपट महाराष्ट्राचे लाडके शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित असल्यामुळे हा चित्रपट एक म्युझिकल जर्नी घेऊन येत आहे. या चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी अजय अतुल यांनी सांभाळली आहे. जय जय महाराष्ट्र माझा, येळकोट येळकोट अशा शाहीर साबळे यांनी रचलेलय लोकप्रिय गाण्यांची लवकरच प्रेक्षकांसोबत नव्या पद्धतीने भेट होणार आहे. तत्पूर्वी आज २७ फेब्रुवारी ‘मराठी भाषा दिना’निमित्त या चित्रपटातील पहिले प्रेमगीत रिलीज करण्यात आले आहे. या गाण्याचे शीर्षक ‘बहरला हा मधुमास’ असे आहे.
अंकुश चौधरीने हि पोस्ट शेअर करताना लिहिले आहे कि, ‘दर बारा कोसावर मराठी भाषा बदलते.. तिचे वेगवेगळे रंग त्या त्या भागातल्या संस्कृतीच्या, परंपरेच्या, बोलीच्या खुणा मिरवत असतात.. कुठल्या वळणावर ही माय मराठी मृदू भासते तर कुठे कणखर.. खुठे खट्याळ होऊन हसवते तर कुठे खोचकही होतेच.. असेच मराठी भाषेतले दोन परस्पर विरोधी रंग आम्ही घेऊन आलोय ‘ महाराष्ट्र शाहीर ‘ ह्या आगामी चित्रपटातील ह्या नव्या कोऱ्या प्रेमगीताच्या माध्यमातून..
एकीकडे पांढरपेशा सवर्ण समाजातील रेखीव मराठी.. म्हणजे भानूमती.. तर दुसरीकडे कृष्णा काठच्या सातारी मातीत रुजलेली रांगडी मराठी.. म्हणजे कृष्णा.. आज मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून सादर करत आहोत १९४२ सालच्या रंगात रंगलेले आणि २०२३ सालच्या तरुणाईला भावलेले एक अस्सल मराठी प्रेमगीत.. बहरला हा मधुमास ….’
महाराष्ट्र शाहीर या चित्रपटातील हे पहिले वहिले प्रेमगीत असून या गाण्यातील अंकुश चौधरी आणि सना शिंदे यांची केमिस्ट्री अगदी फुलपाखराच्या नाजूक स्पर्शासारखी भासते आहे. या गाण्याला श्रेया घोषाल आणि अजय गोगावले यांच्या सप्तसुरांची साथ लाभ आहे. ज्यामुळे हे गाणे ऐकताच एक नवे चैतन्य आणि उत्साह अंगी संचारतो आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक केदार शिंदे हे नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘महाराष्ट्र शाहीर’चे अपडेट देत असतात. हा चित्रपट शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित असल्यामुळे संपूर्ण संगीत विश्वाच्या नजरा या चित्रपटाच्या प्रदर्शनाकडे लागून राहिल्या आहेत. हा चित्रपट येत्या २८ एप्रिल २०२३ रोजी प्रदर्शित होणार असून या चित्रपटाबाबतची उत्सुकता दिवसागणिक वाढतच चालली आहे.
Discussion about this post