हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा मुलगा सोहम चाकणकर हा मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. ‘तू आणि मी, मी आणि तू’ या चित्रपटातून सोहम चाकणकर एका विशेष भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाची कथा प्रेमविषयक असून यामध्ये सोहम गणेश नामक समंजस, साध्या आणि होतकरू मुलाची भूमिका साकारत आहे. शिवाय या चित्रपटातून सोहमचा रोमँटिक अंदाज आपल्याला पहायला मिळणार आहे. या चित्रपटात सोहमसोबत अन्य कोणते कलाकार पाहायला मिळणार आहेत या बाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. ‘तू आणि मी, मी आणि तू’ या चित्रपटाची निर्मिती राजू तोडसाम, ऋषभ कोठारी आणि सागर जैन यांनी जैन फिल्म प्रॉडक्शनच्या बॅनरखाली केली आहे. कपिल जोंधळे हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करीत आहेत.
सोहमचा हा पहिलाच चित्रपट असल्यामुळे तो फार उत्सुक आहे. तर आपला मुलगा एका वेगळ्या क्षेत्रात कार्यरत राहील याबाबत रुपाली चाकणकर यांनीही आनंद व्यक्त केला आहे. आपल्या पहिल्या वहिल्या चित्रपटाबद्दल बोलताना सोहम म्हणाला, “अभिनय क्षेत्रात येण्याची संधी मला निर्माते सागर जैन यांनी दिली. दिग्दर्शक कपिल सरांनी दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल मी सर्वप्रथम त्यांचे आभार मानतो. शूटिंगला आल्यानंतर मला टीमने खूप साथ दिली.
ज्यामुळे मी या क्षेत्रात नवीन आहे याची जाणीव मला झाली नाही. कपिल सरांनी घेतलेल्या वर्कशॉपमधून आणि त्यांनी केलेल्या मार्गदर्शनांमधून बरंच काही नव्याने शिकता आलं आणि माझा अभिनयाबाबतीतचा रस वाढत गेला. ‘तू आणि मी, मी आणि तू’ चित्रपटाची कथा रोमँटिक आणि फ्रेश असल्याने काम करायला मज्जा आली. या क्षेत्रात मला बरीच उंची गाठायची आहे आणि त्यासाठी मी खूप मेहनत घेणार आहे.”
तर आपल्या मुलाच्या मराठी सिनेसृष्टीतील पदार्पणाबाबत बोलताना रुपाली चाकणकर म्हणाल्या कि, “सर्वप्रथम मी असं सांगेन की सोहमला मिळालेल्या या संधीमागे पूर्णतः त्याचं श्रेय आहे. माझा यात काहीच वाटा नाही. उलट त्याचा हा निर्णय ऐकून मी आश्चर्यचकित झाले. माझ्यासाठी खरंच अत्यंत आनंदाची बातमी आहे. आमच्या कुटुंबात कोणी अद्याप या क्षेत्रात नाही. सोहम वेगळं क्षेत्र निवडून त्यात कामगिरी करत आहे हे पाहून खूप आनंद होत आहे. आमच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद सोहमच्या मागे कायम आहेतच, आणि नक्कीच आशा आहे की, त्याने निवडलेल्या या क्षेत्रात तो स्वत:चं वेगळं स्थान निर्माण करेलं.”
Discussion about this post