हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या सोशल मीडियावर एक उर्फी जावेद आणि दुसरी गौतमी पाटील यांची रोजच चर्चा असते. उर्फी तिच्या अर्ध्यामुर्ध्या कपड्यांमुळे तर गौतमी तिच्या अश्लील नृत्यामुळे सोशल मीडियावरील युजर्सचे लक्ष वेधून घेत असते. या दोघींच्या विषयांवरून बऱ्याच राजकारण्यांनी आपापली मत स्पष्ट केली आहेत.
मात्र तरीही उर्फी आणि गौतमी यांची मनमानी सुरूच आहे. मध्यंतरी उर्फी जावेद विरुद्ध भाजपा नेत्या चित्रा वाघ हे प्रकरण चांगलंच गाजलं होतं. त्यानंतर अलीकडेच चित्रा वाघ आणि सुषमा अंधारे यांच्यातही शाब्दिक चकमक झाल्याचे पहायला मिळाले. अशातच आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना उर्फी आणि गौतमीवर कारवाई का होत नाही..? असा प्रश्न विचारण्यात आला आहे.
एका प्रसिद्ध वृत्त वाहिनीने घेतलेल्या मुलाखतीत रुपाली चाकणकर यांना प्रश्न विचारण्यात आला होता कि, गौतमी पाटील आणि उर्फी जावेद यांच्यामुळे महाराष्ट्रातील संस्कृतीचं विकृतीकरण होत असल्याचे वारंवार बोलले जात आहे. या दोघींविषयी अनेक तक्रारी राज्य महिला आयोगाकडे आल्या आहेत. असे असूनही अद्याप कोणतीही कडक कारवाई का केली नाही..?
यावर रुपाली चाकणकर यांनी सांगितलं कि, ‘गौतमी पाटील करतेय ते नृत्य नाही. या प्रकरणात आयोगाकडे येणाऱ्या तक्रारींची दखल घेऊन संबंधित व्यक्ती, संबंधित विभाग वा संस्था यांच्याकडे हे प्रकरण पाठवले जाते. पण राज्यघटनेने तुम्हाला, मला जो व्यक्ति स्वातंत्र्याचा, भाषा स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे, त्यामुळे कोणी काय घालावं? काय बोलावं? काय खावं? हे कोणीच कुणाला सांगू शकत नाही’.
पुढे म्हणाल्या, ‘घटना आपल्याला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देते. असे असताना शील व अश्लील याची परिभाषा आपण ठरवू शकत नाही. त्यामुळे तुम्हाला एखादी गोष्ट अश्लील वाटत असेल तर दुसऱ्याला ती गोष्ट शील वाटूचं शकते. त्यामुळे ही परिभाषा स्थळ, काळ वेळपरत्वे बदलत राहते. या संदर्भात कोणतीही स्पष्ट व्याख्या कायद्यात नाही.
या दोघीही तुमच्या दृष्टीकोनातू अश्लील वाटत असल्या तरी दुसऱ्यांच्या नजरेत त्या शील असू शकतात. म्हणून आपण त्यांच्यावर कोणतीही कारवाई करू शकत नाही. पण आपण त्यांना समज नक्कीच देऊ शकतो. कायदा व सुव्यवस्था पाहता त्यासाठीचे काही परिमाण ठरले आहेत. त्याहून पलीकडे जाऊन वेगळी कोणतीही कारवाई करता येणार नाही’.
Discussion about this post