हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेता संदीप पाठक हा त्याच्या भन्नाट कॉमिक टायमिंगमूळे नेहमीच चर्चेत असतो. विविध मालिका, नाटक, एकपात्री, कॉमिक शो, सूत्रसंचालन अशा विविध माध्यामातून संदीप नेहमीच प्रेक्षकांसमोर येत राहिला आहे. याशिवाय अनेकदा संदीप विविध मुद्द्यांवर आपले परखड मत मांडतानादेखील दिसतो. सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करून अनेकदा संदीप चर्चेत राहतो. नुकताच प्लॅनेट मराठीचा टॉक शो ‘पटलं तर घ्या विथ जयंती’ यामध्ये संदीप पाठक सहभागी झाला होता आणि यावेळी त्याने देशाच्या राजकारणावर परखड मत व्यक्त केले आहे.
आपल्या लाडक्या कलाकारांच्या आयुष्याबद्दल जाणून घेण्याची त्यांच्या चाहत्यांना नेहमीच उत्सुकता असते. त्यातही हे कलाकार फावल्या वेळात काय करतात, असा प्रश्न नेहमीच अनेकांना पडतो. अशा अनेक प्रश्नांची उत्तरे प्लॅनेट मराठीच्या या टॉक शोमध्ये नेहमीच मिळत असतात. अभिनेता संदीप पाठक आणि अभिनेता पुष्कर श्रोत्री यांनी या टॉक शोमध्ये धम्माल गप्पा मारल्या. विविध किस्से सांगितले आणि काही खाजगी गोष्टींचाही उलघडा केला. हा एपिसोड उद्या म्हणजेच शुक्रवारी, १७ फेब्रुवारी २०२३ रोजी प्रसारित होणार आहे.
यावेळी संदीप पाठकने देशाच्या राजकारणाविषयी केलेले विधान चांगलेच चर्चेत आले आहे. संदीप म्हणाला कि, ‘आपल्या देशाचं कालचं, आजचं आणि उद्याचं राजकारणही रस्ते देऊ, पाणी देऊ आणि वीज देऊ याभोवतीच फिरणार आहे. यातून आपण कधी बाहेर पडणार आहोत..? काय माहित..’ असे म्हणत संदीपने एक गाम्भी प्रश्न या शोमध्ये उपस्थित केला आहे. त्यामुळे हा एपिसोड थोडं गांभीर्य आणि खूप मजा घेऊन येणार आहे.
Discussion about this post