हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडचा द खलनायक अर्थात लोकप्रिय अभिनेता संजय दत्त गेली अनेक वर्षे प्रेक्षकांचे अविरत मनोरंजन करत आहे. नायक, खलनायक साकारून संजू बाबाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. गेल्या काही दिवसांपासून तो बॉलिवूडसह साऊथ चित्रपटातही आपल्या अभिनयाची छाप पाडतो आहे. अशाच एका आगामी चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान बॉम्बस्फोटाचा सीन शूट करत असताना अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. या अपघातात अभिनेता संजय दत्त जखमी झाल्याचे समजले आहे.
बहुप्रतीक्षित चित्रपट ‘केडी – द डेव्हिल’च्या शूटिंगदरम्यान हा अपघात झाल्याचे समोर आले आहे. सध्या आगामी कन्नड चित्रपट ‘केडी – द डेव्हिल’चे शूटिंग बेंगळुरूजवळ सुरू आहे आणि काल (बुधवारी) बॉम्बस्फोटाच्या सीक्वेन्सचे शूटिंग सुरू होते. याच दरम्यान बॉम्बस्फोटाचे शूट करताना स्फोट झाला आणि संजय जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात संजय दत्तला बऱ्याच जखमा झाल्या आहेत. हातावर आणि चेहऱ्यावर प्रामुख्याने जखमा झाल्याचे सांगितले जात आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, ॲक्शन डायरेक्टर डॉ. रवि वर्मा यांच्या ‘केडी: द डेव्हिल’ या सिनेमातील ॲक्शन सीन शूट होत होता. दरम्यान सीनच्या गरजेनुसार रील बॉम्बस्फोट करताना त्यावेळी खरोखर एक स्फोट झाला आणि यात अभिनेता संजय दत्त जखमी झाला. या घटनेनंतर चित्रपटाचे शूटिंग लगेच थांबवण्यात आले आणि अभिनेत्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असून चाहते मात्र चिंता व्यक्त करत त्याच्या तब्येतीसाठी प्रार्थना करतं दिसत आहेत. ‘केडी: द डेव्हिल’ या चित्रपटात संजय दत्त खलनायकाची भूमिका साकारत आहेत. तसेच या चित्रपटात अभिनेत्री शिल्पा शेट्टी हि मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
Discussion about this post