हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेता संकर्षण कऱ्हाडे हा एक उत्तम अभिनेता आहेच. पण याहीपेक्षा तो एक उत्तम लेखक आणि कवी आहे. त्याच्या शब्दांमधली ताकद अफाट आहे. त्याच्या लेखनात दंग व्हावं इतकी त्याची लेखणी पावरफुल आहे. संकर्षण कऱ्हाडे आज हे नाव भल्याभल्यांना परिचयाचे असले तरी त्याचे पाय जमिनीवर आणि श्रद्धा देवावर असल्यामुळे तो माणूस म्हणून तितकाच भक्कम आहे. त्याच हे व्यक्तिमत्व असंच सदोदित फुलत राहो अशी त्यांच्या चाहत्यांची इच्छा आहे. अशा या लाडक्या संकर्षणने त्याला आलेल्या दैवी प्रचितीचा एक अनुभव चाहत्यांसह शेअर केला आहे. हा अनुभव वाचताना क्षणभर का होईना तुम्हीही हरवला नाहीत नवलंच!
तर त्याचं झालं असं कि, ‘संकर्षण प्रयोगासाठी कोकणात गेला होता. यावेळी त्याला गणपतीपुळ्याच्या बाप्पाचे दर्शन घ्यायची इच्छा तर होती. मात्र वेळ काहीसा कमी होता. पण त्याच्या मनात विश्वास होता कि बाप्पा त्याला दर्शन देईलच. कसं ते माहित नाही.. पण बाप्पा त्याला भेटणार होताच.’ हा विश्वासच त्याच्या आणि बाप्पाच्या भेटीचे नियोजन करीत होता. हा प्रसंग फार विलक्षण आणि दैवी आहे. हा प्रसंग सांगताना संकर्षण म्हणतो कि, ‘मी परवा मुंबईहुन नाटकाच्या कोकण दौऱ्यासाठी निघतांना घरात सहज म्हणालो कि, रत्नागिरीहून २.३० तासावर गणपतीपुळे आहे. दर्शनाला जाऊन येईन. तेव्हा बाबा काळजीने म्हणाले कि, का धावपळ करतोस..? वेळ मिळालाय तर दिवसभर आराम कर. त्यात तू जाणार कसा..? प्रवासाचं काय नियोजन..? हे विचारल्यावर मी अगदी सहज थाटात म्हणालो कि, ‘बाबा काळजी करु नका.. मला गणपती स्वत: घ्यायला येईल..’ आणि घरुन निघालो…..’
‘काल रात्री रत्नागीरीच्या प्रयोगाला गणपतीपुळे देवस्थानचे पुजारी श्री.उमेश घनवटकर प्रसादाचे उकडीचे मोदक घेऊन आले.. मला म्हणाले चला दर्शनाला.. गाडी घेऊनच आलोय.. मी म्हणालो पण माझी काही तशी तयारी नाहीये.. शिवाय आमची रहायची सोय चिपळूनला आहे.. तेव्हा ते म्हणाले.., रहायची, दर्शनाची, जेवणाची… सगळी सोय, नियोजन मी करतो.. तुम्ही फक्त गाडीत बसा आणि चला.. यावेळी मला माझंच स्वत:चंचं वाक्यं आठवलं ‘बाबा काळजी करु नका.. मला गणपती स्वत: घ्यायला येईल..’ मी रत्नागिरीच्या प्रयोगानंतर त्यांच्या गाडीत बसलो तर अर्थातच समोर गणरायाचा छानसा फोटो..
काल मध्यरात्री सुखरूप इथे पोचलो .. राहण्याची उत्तम सोय त्यांनीच केली.. आज सकाळी त्यांनीच मला सोवळं दिलं.. दर्शनाला घेऊन गेले.. माझ्या हातून बाप्पाचा अभिषेक केला.. आणि मनसोक्तं खायला घातलं.. मी तुम्हाला कसा सांगु या प्रत्येक क्षणांत मला असं वाटत होतं कि हे सगळं गणपती मी उच्चारलेल्या त्या एका वाक्यासाठी माझ्याकडून करवून घेतोय.. माझी आई मला माझ्या लहानपणापासून सांगत आलीये कि, ‘बोलतांना कायम चांगलं बोलावं.. ‘मी उच्चारलेल्या त्या एका चांगल्या वाक्यासाठी गणपती बाप्पाने माझ्यासाठी काय काय केलं.. मी खूप भाराऊन गेलोय.. बाप्पा मोरया ..’ संकर्षणच्या या अनुभवावर अनेकांनी अनेक प्रतिक्रिया देत आपापले अनुभव देखील सांगितले आहेत. शेवटी काय बाप्पाचं तो… गणपती बाप्पा मोरया!!!
Discussion about this post