हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आज दिनांक ४ नोव्हेंबर २०२२ असून प्रबोधिनी एकादशी आहे. प्रबोधिनी एकादशी म्हणजे मोठी एकादशी वा देव उठणी एकादशी. आषाढी एकादशीच्या दिवशी म्हणजे आषाढ शुक्ल एकादशीला, शेषशायी भगवान श्री विष्णू झोपी जातात. म्हणूनच आषाढी एकादशीला ‘शयनी एकादशी’ असे म्हणतात. आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशीपर्यंत देव झोपलेले असतात अशी समजूत आहे. पण आजच्या दिवशी देव निद्रेतून उठतात. त्यामुळे आजचा दिवस मोठा. मान्यतेनुसार, आज श्री विष्णूंना उठवून मंगल कार्य आरंभ करण्याची प्रार्थना केली जाते. या दिवशी पंढरपूरच्या पांडुरंगाचे दर्शन केल्याने मोक्ष प्राप्ती होते अशी समजूत आहे. त्यामुळे आजच्या दिवशी विठूभेटीसाठी भाविकांची मोठी गर्दी होते.
हि गर्दी सांभाळण्यासाठी काही लोकांची नेमणूक केली जाते. जे सुनोयोजित कामे पार पडून लोकांची सेवा करतात. शेवटी देवाची सेवा म्हणजे वेगळं तरी काय ओ.? माणसाने माणसातला देव ओळखणं जास्त महत्वाचं. अशीच देवा अभिनेता संकर्षण कऱ्हाडे याचे वडील गिरीश कऱ्हाडे गेली अनेक वर्ष करीत आहेत. म्हणून आज या निमित्ताने अभिनेता संकर्षण कऱ्हाडे याने वडिलांचे कौतुक प्रकट करणारी एक खास पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्याने आवर्जून विठ्ठल भेटीसाठी यात्रा करणाऱ्या वारकऱ्यांच्या वारीमागील नेमक्या काय भावना असतात हे सांगितले आहे.
संकर्षणने लिहिलंय कि, ‘आज कार्तिकी एकादशी..’विठ्ठल विठ्ठल.. आमचे बाबा गेले ८/१० दिवस पंढरपूरी गेलेत.. सेवेला.. आता सेवा म्हणजे काय..? तर, तिथे जाउन निस्वार्थीपणे नेमून दिलेले काम करणे.. पावत्या फाडणे .. भक्तांसाठी नियोजन करणे .. गेली अन्नेक वर्षं हजारो लोक हे करत आहेत.. पण मला आमच्या बाबांचं फार कौतुक वाटतं.. स्टेट बॅंक आॅफ हैद्राबाद मध्ये मोठ्ठं पद भूषवलेले, सगळं एैश्वर्य ऊभं केलेले, अनुभवलेले आमचे बाबा तिथे जाउन मस्त भक्तनिवासमध्ये एका हाॅलमध्ये राहतात. सतरंजी टाकून झोपतात, चंद्रभागेवर स्नानाला जातात .. विठ्ठल, पांडूरंग आपल्याला हेच सांगतो..: ”आपलं ते सगळं विसरून समरस होणे म्हणजे वारी.’ म्हणुनच ज्ञानेश्वर माऊलि म्हणतात :
“ज्ञानदेव म्हणे हरि जप करणे.. तुटेल धरणे प्रपंचाचे ..”
एरवी सतत फोन करणारे आमचे बाबा गेल्या आठ दहा दिवसांत तिकडेच रमलेत.. आम्हालाच फोन करावा लागतो.. आणि फोनवर आता हॅलो नाही ‘रामकृष्ण हरि’ म्हणतात.. हे सगळं करायला वेगळीच ऊर्जा लागते .. खरंच .. अशी सेवा करणाऱ्या त्या सगळ्यांनाच, हा निस्वार्थ भाव शिकवणाऱ्या त्या वारिला.. आणि ह्या सगळ्यांची वाट पाहात ‘युगं अठ्ठाविस’ ऊभ्या असणाऱ्या त्या ‘पांडूरंगाला’ दंडवत.. पांडूरंग आवडायला फार भाग्यं लागतं खरंच.. म्हणुन माऊली म्हणतात:
“बहुत सुकृतांची जोडी , म्हणुनी विठ्ठली आवडीं..” रामकृष्ण हरि ..’
Discussion about this post