हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दिग्दर्शक केदार शिंदेंच्या ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटाबाबतची उत्सुकता दिवसागणिक वाढताना दिसत आहे. या चित्रपटात मराठमोळा अभिनेता अंकुश चौधरी हा शाहीर साबळेंची भूमिका साकारतो आहे. अतिशय हुबेहूब अशी लकब घेत अंकुशने महाराष्ट्राला भुरळ घातली आहे. सोमवारी या चित्रपटाचा पहिला टिझर राज ठाकरेंच्या हस्ते प्रदर्शित झाला. यावेळी लॉन्च सोहळ्यात शाहीर साबळे यांच्या पत्नी श्रीमती राधाबाई कृष्णराव साबळे उपस्थित होत्या. शाहिरांची रुपेरी पडद्यावरील झलक पाहून त्या भावुक झाल्याचे दिसले.
केदार शिंदे आपल्या लाडक्या आजीला या खास लॉन्च सोहळ्याच्या निमित्ताने आग्रहाने घेऊन आले होते. ‘महाराष्ट्र शाहीर’ची झलक पाहताच राधाबाईंच्या भावना एकवटून आल्या आणि त्या भावुक झाल्या. या प्रसंगी बोलताना भावुक झालेल्या राधाबाई म्हणाल्या, ‘हा माझ्यासाठी एक अत्यंत हळवा प्रसंग आहे. आज मी भाऊक झाले आहे’. अत्यंत कमी शब्दांत त्यांनी आपल्या अंतर्मनातील भावनांना वाट मोकळी करून दिली. याशिवाय टिझर लाँच प्रसंगी चित्रपटाचे संगीतकार अजय – अतुल म्हणाले, ‘आम्ही शाहिरांकडून खूप शिकलो. त्यांच्यामुळे केदार आणि आमची मैत्री झाली. या चित्रपटाचा भाग होता आले, हे आमचे भाग्य आहे. त्यासाठी आम्ही केदारचेही आभारी आहोत’.
‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटाची प्रस्तुती एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंट आणि केदार शिंदे प्रॉडक्शन्स यांची आहे. तर चित्रपटाचे निर्माते संजय छाब्रिया आणि बेला केदार शिंदे हे आहेत. या चित्रपटाला अजय आणि अतुल या महाराष्ट्राच्या लाडक्या जोडीचे मंत्रमुग्ध करणारे संगीत लाभले आहे. याशिवाय चित्रपटाचे लेखन ज्येष्ठ लेखिका आणि दिग्दर्शिका प्रतिमा कुलकर्णी यांचे आहे. ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटाच्या टीझरचा प्रकाशन सोहळा हा शाहिरांच्या आठव्या स्मृतीदिनी म्हणजेच सोमवारी २० मार्च २०२३ रोजी सकाळी वांद्रे येथील जिओ वर्ल्ड ड्राइव्ह येथे झाला. ‘महाराष्ट्र शाहीर’ हा बहुचर्चित चित्रपट २८ एप्रिल २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे.
Discussion about this post